बॉलिवूड अभिनेता आमिर खान आणि त्याची पत्नी या दोघांनी एकमेकांपासून विभक्त होण्याचा निर्णय
आयुष्यातील नव्या अध्यायाची सुरुवात करायची
बॉलिवूड अभिनेता आमिर खान आणि त्याची पत्नी या दोघांनी एकमेकांपासून विभक्त होण्याचा निर्णय
आयुष्यातील नव्या अध्यायाची सुरुवात करायची
मुंबई : बारामती वार्तापत्र
बॉलिवूड अभिनेता आमिर खान आणि त्याची पत्नी किरण राव या दोघांनी एकमेकांपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. आमिर खान आणि किरण रावने संयुक्त निवेदन जारी करुन या निर्णयाविषयी माहिती दिली.
“गेल्या 15 वर्षांच्या वैवाहिक जीवनानंतर आम्ही घटस्फोट घेत असल्याचे या निवेदनात म्हटले आहे. आम्हाला आमच्या आयुष्यातील नव्या अध्यायाची सुरुवात करायची आहे. त्यामध्ये आम्ही पती-पत्नी नव्हे तर पालक आणि एकमेकांसाठी कुटुंबातील एक सदस्य असू,” असे या निवेदनात म्हटले आहे. आमिर खान आणि किरण राव यांच्या घटस्फोटामागील नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही.
आमिर खान आणि किरण राव यांचे पत्र
आमिर खान आणि किरण राव यांनी जाहीर केलेल्या पत्रकात असं म्हटलं आहे की, 15 वर्षाच्या सुंदर सोबतीमध्ये आयुष्यभर स्मरणात राहणारे अनुभव जगता आले. आनंद, हास्य आणि आमचं नातं हे विश्वास, आदर आणि प्रेम याच्या आधारावर फुलले. आता आम्ही आमच्या आयुष्यातील नवा अध्याय सुरु करत आहोत. आम्ही आता फार काळासाठी पती-पत्नी असं न राहता सह पालक आणि कुटुंब म्हणून एकत्र राहू. आम्ही गेल्या काही दिवसांपासून वेगळे राहण्यासाठी नियोजन सुरू केलं होतं. आता हा निर्णय झाल्यामुळं बरं वाटत आहे. एक्सटेंडेड कुटुंबाप्रमाणं आम्ही वेगळं राहिलो तरी आयुष्यातील महत्वाच्या घटना शेअर करत राहू.
आम्ही मुलगा आझादसाठी पालक म्हणून दोघंही एकत्रितपणानं जबाबदारी पार पाडू, त्याचा सांभाळ दोघेही संयुक्तपणानं करु, असं देखील म्हटलं आहे. आम्ही एकत्रितपणे चित्रपट, पाणी फाऊंडेशन आणि इतर प्रकल्पांमध्ये काम करु.
आमचे कुटुंबिय आणि मित्र यांना देखील धन्यवाद देतो कारण आमच्या नात्यामध्ये ह घडत असताना त्यांनी सातत्यानं पाठिंबा दिला. त्यांच्या पाठिंब्याशिवाय आम्ही या निर्णयापर्यंत पोहोचलो नसतो. आम्ही आमचे शुभचिंतक आम्हाला या निर्णयाबद्दल शुभेच्छा देतील अशी आशा आहे. हा घटस्फोट म्हणजे काही शेवट नाही. नवीन प्रवासाची सुरुवात आहे, असे संयुक्त पत्र आमिर खान आणि किरण राव यांनी लिहिले आहे.
दुष्काळग्रस्तांचे अश्रू पुसण्यासाठी अमिरच्या साथीने किरण राव यांचं मोठं काम
दुष्काळग्रस्तांचे अश्रू पुसण्यासाठी आमिर खान यांच्याबरोबर किरण राव शेताच्या बांधावर गेल्या होत्या. महाराष्ट्रातील अनेक जिल्हे त्यांनी पालथे घातले. अनेक जिल्ह्यांमध्ये त्यांनी ‘पाणी फाउंडेशन’च्या माध्यमातून मोठं काम केलं. यासाठी केंद्र शासनाने आणि राज्य शासनाने त्यांची वेळोवेळी स्तुती केली. त्यांना भक्कम पाठिंबा दिला. किरण राव आणि आमीर खान या दोघांनी कित्येक गावांमध्ये पाण्याच्या रूपाने नवसंजीवनी आणली. जिथं गेली अनेक दशकं माळरान होतं तिथं हिरवी स्वप्न फुलवली. आमिर खान, किरण राव आणि संपूर्ण पाणी फाउंडेशनच्या टीमने महाराष्ट्रातला दुष्काळ हटवण्यासाठी मोठं काम केलं.