ब्रेकिंग न्युज राज्यात येत्या रविवारपासून रात्रीची जमावबंदी लावण्याच्या सुचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

कडक उपाययोजनांचा विचार करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे

ब्रेकिंग न्युज राज्यात येत्या रविवारपासून रात्रीची जमावबंदी लावण्याच्या सुचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

कडक उपाययोजनांचा विचार करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे

बारामती वार्तापत्र रिपोर्ट

राज्यात कोरोना रुग्णांची वाढलेली संख्या लक्षात घेता गर्दी टाळणे, वाढत्या संसर्गाला रोखण्यासाठी काही कडक उपाययोजना लागू करणे आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी करणे नाईलाजाने गरजेचे ठरत असल्याने संपूर्ण राज्यात रविवारी (दि. 28 मार्च 2021) रात्रीपासून जमावबंदी आदेश लागू करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या. यासंबंधीचे स्वतंत्र आदेश आजच मदत व पुनर्वसन विभागाकडून निर्गमित व्हावेत, असेही श्री.ठाकरे म्हणाले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलीस अधीक्षक, जिल्हा शासकीय रुग्णालयाचे सिव्हिल सर्जन, जिल्हा तसेच राज्य टास्क फोर्सचे सदस्य, वैद्यकीय महाविद्यालयांचे अधिष्ठाता यांच्याशी संवाद साधून कोविड स्थिती, करण्यात येत असलेल्या उपाययोजना जाणुन घेतल्या त्यावेळी ते बोलत होते. यावेळी  दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून आरोग्य मंत्री राजेश टोपे तर वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, माजी मंत्री डॉ. दीपक सावंत, मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव प्रदीप व्यास, वैद्यकीय शिक्षण सचिव सौरभ विजय, मुख्यमंत्र्यांचे सचिव आबासाहेब जऱ्हाड, मदत आणि पुनर्वसन विभागाचे सचिव असीम गुप्ता, महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल,  वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी वर्षा निवासस्थानी बैठकीस उपस्थित होते.

लॉकडाऊन लावण्याची इच्छा नाही पण…

मुख्यमंत्री श्री.ठाकरे म्हणाले की, मला लॉकडाऊन लावण्याची अजिबात इच्छा नाही, परंतु वाढती रुग्णसंख्या विचारात घेता आपण ज्या आरोग्य सुविधांची मोठ्याप्रमाणात राज्यभर उभारणी केली त्या सुविधाही कमी पडतील की काय अशी शक्यता निर्माण होतांना दिसत आहे. हीच बाब लक्षात घेऊन प्रत्येक जिल्ह्यांनी त्यांच्या आरोग्य सुविधा, बेडस व औषधांची उपलब्धता आणि त्यात करावयाची वाढ याकडे लक्ष केंद्रीत करावे अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

धोका टळला नाही उलट वाढला

ब्रिटनसारख्या देशात दुसरी लाट आल्यानंतर त्यांनी दोन अडीच महिन्याच्या लॉकडाऊननंतर आता हळुहळु पुन्हा काही गोष्टी खुल्या करण्यास सुरुवात केली आहे. हीच परिस्थिती आता आपल्याकडे निर्माण होताना दिसत आहे. धोका टळला नाही, उलट तो अधिक वाढला आहे हे जनतेनेही लक्षात घेण्याची गरज आहे. रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे, येत्या काळात ती आणखी किती वाढेल हे सांगता येत नाही. अशावेळी कडक उपाययोजनांचा विचार करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. ज्या जिल्ह्यात रुग्णसंख्या वेगाने वाढते आहे तिथे आवश्यकता असेल तर जरूर लॉकडाऊन लावा पण ते लावताना अचानक लावू नका, लोकांना त्यासाठीची कारणे सांगून लॉकडाऊन लावा अशा सूचनाही त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या.

कडक निर्बंधांचे संकेत

जनतेनेही कोविड नियम पाळले नाही तर नाईलाजाने येत्या काही कालावधीत अधिक कडक  निर्बंध लावावे लागतील हे लक्षात घ्यावे, असे आवाहन करून मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले की आपण बेडस, आरोग्य सुविधा वाढवू परंतु डॉक्टर्स, नर्सेस आणि आरोग्य कर्मचारी कसे वाढवणार, हे लक्षात घेतले पाहिजे. खासगी आस्थापनांना त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीसंदर्भात तसेच कार्यालयीन वेळेसंदर्भात बदल करण्याबाबत राज्य शासनाने मार्गदर्शक सूचनांचे आदेश निर्गमित केले आहेत. ते याचे पालन करत आहेत की नाही याची काटेकोरपणे पाहणी केली जावी तसेच मॉल्स, बार, हॉटेल्स, सिनेमागृहे अशा गर्दीच्या ठिकाणी त्यांना घालून दिलेल्या एस.ओ.पीची अंमलबजावणी होत नसल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी, मॉल्स रात्री आठ ते सकाळी सात या वेळेत ते बंद राहतील याची काळजी घ्यावी, गर्दी होणार नाही हे पहावे, सामाजिक राजकीय आणि सांस्कृतिक कार्यक्रमावर घातलेली बंधने पाळावीत अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या.

लसीकरणाचा वेग वाढवा

लसीकरणाच्या कार्यक्रमात राज्य आज देशात एक नंबरवर असले तरी आणखी प्रभावीपणे हा कार्यक्रम राबविण्याच्या सूचना देऊन मुख्यमंत्री म्हणाले की, कोरोनाचा नवीन विषाणु आणि औषोधोपचाराची पद्धती यासंबंधीचे मार्गदर्शन टास्क फोर्सच्या सदस्यांनी वेळोवेळी जिल्हा प्रशासनाला करावे

याचीही काळजी घ्या

कोविड रुग्णांच्या उपचारासाठी सुरु केलेल्या तात्पुरत्या रुग्णालयांच्या इमारती, जागा यांची  अग्निसुरक्षा तपासली जावी, औषधसाठा, हॉस्पीटलमधील सोयी-सुविधा, ऑक्सीजन साठा व पुरवठा यासंबंधीची योग्य ती कार्यवाही करावी. व्हेंटिलेटर्सची, आय.सी.यु व ऑक्सीजन बेडसची संख्या वाढविण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. राज्यात टेस्टिंगचे प्रमाण आपण खूप वाढवले आहे, मुंबईत दिवसाला 50 हजार स्वॅबचे संकलन होत आहे संपूर्ण राज्यात ही टेस्टींगची संख्या वाढवा, वाढणाऱ्या रुग्णसंख्येला पुरेशी पडेल अशी आरोग्य सुविधा आहे का याचे नियोजन करा असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

अधिक लसीच्या पुरवठ्याबाबत केंद्राकडे मागणी करावी- अमित देशमुख

गावात लसीकरणाची पुर्वतयारी झाली का याची शहनिशा केली जावी तसेच लसीकरणाचा वेग वाढवतांना राज्याला केंद्राकडून मोठ्या संख्येने लस उपलब्ध होण्यासाठी केंद्राकडे मागणी करावी असे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यावेळी म्हणाले. त्यांनी ऑक्सीजनचा पुरवठा सुरळित राहण्यासाठी त्याची मागणी उत्पादकांपर्यंत वेळेत पोहोचण्याची गरजही व्यक्त केली. शाळा आणि महाविद्यालये सुरु होण्यापूर्वी शिक्षक आणि प्राध्यापकांचे लसीकरण पूर्ण केले जावे, ट्रान्सपोर्ट व्यवस्थेत काम करणाऱ्या लोकांनाही लस देण्यात यावी असेही ते म्हणाले. राज्याच्या ग्रामीण भागातही रुग्णसंख्या वाढत असल्याने मुंबई पुण्याप्रमाणे ज्या जिल्ह्यात रुग्णसंख्या वाढते आहे तिथे ऑक्सीजन बेडची संख्या वाढवावी, तसेच लक्षणे नसलेल्या परंतू विलगीकरणाची आवश्यकता असलेल्या रुग्णांसाठी कोविड सेंटर्स उभारली जावीत अशा सूचनाही त्यांनी केल्या.

राज्यात 52 लाख लोकांना लस देण्यात आली असून राज्य आजघडीला लसीकरणामध्ये देशात पहिल्या क्रमांकाचे राज्य असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!