राजकीय

भाजपची मोठी खेळी;उपमुख्यमंत्रीपद मिळालं पण अजित पवारांचं अर्थ खातं नाहीच, सुनेत्रा पवार यांना मिळाली ‘ही’ तीन खाती

राज्याच्या ११ व्या उपमुख्यमंत्री

भाजपची मोठी खेळी;उपमुख्यमंत्रीपद मिळालं पण अजित पवारांचं अर्थ खातं नाहीच, सुनेत्रा पवार यांना मिळाली ‘ही’ तीन खाती

राज्याच्या ११ व्या उपमुख्यमंत्री

बारामती वार्तापत्र 

अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर आज निधनाच्या चौथ्या दिवशी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. अजित पवारांकडे अर्थ, नियोजन अशी महत्त्वाची खाती होती, ही खाती राष्ट्रवादी काँग्रेसला (अजित पवार) मिळावीत, अशी अपेक्षा पक्षाला होती.

मात्र सुनेत्रा पवार किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला तुर्तास तरी अर्थ खाते देण्यात आलेले नाही.

अजित पवार यांच्याकडे मधल्या काही वर्षांचा अपवाद वगळता गेल्या अनेक वर्षांपासून अर्थ खात्याची जबाबदारी आहे. यापूर्वी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या आघाडी सरकारच्या काळातही अर्थ खाते राष्ट्रवादी काँग्रेसकडे होते. ज्येष्ठ नेते जयंत पाटील आणि सुनील तटकरे यांनी ते अनेक वर्षे भूषविले होते. तर महाविकास आघाडी आणि महायुती सरकारमध्येही अर्थ खाते अजित पवार यांच्याकडे होते.

सुनेत्रा पवार यांच्याकडे तीन खाती

राज्याच्या ११ व्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना राज्य उत्पादन शुल्क, क्रीडा आणि युवक कल्याण आणि अल्पसंख्याक विकास ही तीन खाती देण्यात आली आहेत. तर अजित पवारांचे नियोजन आणि वित्त हे खाते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःकडे ठेवले आहे.

महायुतीच्या मंत्रिमंडळात अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आणि हसन मुश्रीफ हे राष्ट्रवादी काँग्रेसमधील ज्येष्ठ मंत्री आहेत. अर्थ खाते राष्ट्रवादी काँग्रेसकडेच ठेवण्याचा पक्षाचा प्रयत्न होता. मात्र भाजपा यास तयार नसल्याचे सध्या दिसत आहे.

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांचे २९ जानेवारी रोजी बारामती येथे विमान अपघातात निधन झाले. अजित पवारांच्या अकाली निधनामुळे यंदा राज्याचा अर्थसंकल्प कोण सादर करणार? हा प्रश्न निर्माण झाला होता. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माध्यमांनी प्रश्न विचारला असता ते म्हणाले, “अजितदादांनी अर्थसंकल्पाची भरपूर तयारी केली होती. त्यामुळे आता उद्यापासून मी स्वतः लक्ष घालून अर्थसंकल्पाच्या ज्या काही प्रक्रिया आहेत, त्या मी स्वतः पूर्ण करणार आहे. त्यानंतर आम्ही परिस्थितीनुसार काय करायचं हे ठरवू.”

Back to top button