भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्याविरोधात पुण्यात गुन्हा दाखल
विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झालाय.

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्याविरोधात पुण्यात गुन्हा दाखल
विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झालाय.
पुणे : बारामती वार्तापत्र रिपोर्ट
पुण्यात कोरोना प्रकोप सुरु असताना MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनात सहभाग घेतल्याप्रकरणी तसंच गर्दी केल्याप्रकरणी पुण्यात भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झालाय. कलम 188 प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची 14 मार्चला होणारी पूर्व परीक्षा (MPSC exam) पुढे ढकलल्यामुळे पुण्यात विद्यार्थी आक्रमक झालेत. गुरुवारी पुण्याच्या नवी पेठ परिसरात या विद्यार्थ्यांनी रस्त्यावर ठिय्या आंदोलन केलं. या आंदोलनात आमदार गोपीचंद पडळकर यांनी एन्ट्री घेतली होती. त्यांच्या एन्ट्रीने आंदोलनाला आणखीनच धार आली होती. तसंच त्यांनी आक्रमक भूमिका थेट राज्य सरकारवर सडकून प्रहार केले.
पडळकरांविरोधात गुन्ह्याची नोंद
पुण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना गर्दी न जमवण्याचं आवाहन पोलिस आणि प्रशासन करत आहेत. अशा परिस्थितीत गुरुवारी नवी पेठ भागात हजारो विद्यार्थ्यांनी गर्दी करत सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवला. याच पार्श्वभूमीवर कलम 188 नुसार पडळकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
गोपीचंद पडळकर यांच्यामुळे आंदोलन विद्यार्थ्यांनाही चांगलेच स्फुरण चढले आहे. गोपीचंद पडळकर रस्त्यावर आडवे पडून सरकारविरोधात घोषणबाजी करत आहेत. जोपर्यंत सरकार परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय रद्द करत नाही तोपर्यंत आम्ही येथून हटणार नाही, असा निर्धार गोपीचंद पडळकर यांनी व्यक्त केला. तसंच रात्रीचा मुक्कामही मी रोडवरच करणार असल्याचा त्यांनी बोलून दाखवलं मात्र त्याअगोदरच पुणे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं.
एमपीएससी आंदोलन, रात्रीत काय काय घडामोडी घडल्या?
एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्याच्या निर्णयाला विरोध करत आताच परीक्षा घ्या, अशी मागणी करत दुपारपासून विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरु होतं. या आंदोलनात दुपारी 3 ते 4 च्या सुमारास पडळकर यांची एन्ट्री झाली. पडळकरांच्या एन्ट्रीने आणि माध्यमांनी देखील आंदोलन लावून धरल्याने आंदोलनाला एक वेगळं महत्त्व प्राप्त झालं तसंच आंदोलनाला धार आली. अशा वेळी पडळकरांनीही नेहमीप्रमाणे आक्रमक भूमिका घेत सरकारवर शरसंधान साधलं.
रात्री दहा वाजेपर्यंत त्यांनी विद्यार्थ्यांच्या साथीने रस्त्यावरच ठिय्या मांडला. दहाच्या पुढे काटा सरकायला लागल्यानंतर पुणे पोलिसांनी पडळकर आणि विद्यार्थ्यांची समजूत काढायला सुरुवात केली. पण विद्यार्थी आणि पडळकर ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. अखेर बळजबरीने पुणे पोलिसांनी पडळकरांना ताब्यात घेतलं.
गोपीचंद पडळकर यांना शिवाजीनगर पोलीस ठाण्यात नेण्यात आलं. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख आणि पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ताही यावेळी आले होते. यावेळी पडळकरांना ताब्यात घेतल्यानंतर शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या प्रवेशद्वारावर पडळकर समर्थक आणि भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी मोठी गर्दी केली होती.