भारतरत्न पं.भीमसेन जोशी यांना जन्मशताब्दी वर्षात विविध कार्यक्रमांतून मानवंदना देणार – सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख
गुरूंच्या सन्मानार्थ सवाई गंधर्व महोत्सवाच्या आयोजनातून एक उत्तम पायंडा पाडला.
भारतरत्न पं.भीमसेन जोशी यांना जन्मशताब्दी वर्षात विविध कार्यक्रमांतून मानवंदना देणार – सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख
गुरूंच्या सन्मानार्थ सवाई गंधर्व महोत्सवाच्या आयोजनातून एक उत्तम पायंडा पाडला.
मुंबई,बारामती वार्तापत्र रिपोर्ट
भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दी वर्षाला सुरुवात झाली असून वर्षभर विविध कार्यक्रमांद्वारे त्यांना मानवंदना देण्यात येईल, अशी माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी दिली.
“स्वरभास्कर पं.भीमसेन जोशी हे भारतीय शास्त्रीय संगीतातील एक अलौकिक कलाकार होते. त्यांच्या सुरेल गायकीने जगभरातील रसिकांवर मोहिनी घातली. त्यांनी त्यांच्या गुरूंच्या सन्मानार्थ सवाई गंधर्व महोत्सवाच्या आयोजनातून एक उत्तम पायंडा पाडला. त्यांचे अनेक शिष्य, चाहते जगभरात असून पंडितजींच्या शास्त्रीय संगीत क्षेत्रातील कार्याचा गौरव जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी शासनाच्या वतीने मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर आणि त्यांच्या जन्मस्थळी अशा ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येईल. यात शास्त्रीय गायन, वादन व नृत्य आविष्कार, किराणा घराणा परंपरा गायन, शास्त्रीय गायन, वादन व नृत्य जुगलबंदी, राज्यातील १० अकृषिक विद्यापीठातील युवा गायक, वादक, नृत्य कलाकारांचा कार्यक्रम, अभंगवाणी अशा विविध कार्यक्रमांचा समावेश असेल. राज्य शासनाच्या वतीने या महान गायकाच्या सांगीतिक योगदानाचा जागर यानिमित्ताने केला जाईल”, असेही श्री. देशमुख यांनी सांगितले.