भारतीय संविधानानुसार आरोपींनाही अनेक अधिकार : ॲड.आशुतोष भोसले
आझादी का अमृत महोत्सव कार्यक्रमांतर्गत सदरात केले मार्गदर्शन

भारतीय संविधानानुसार आरोपींनाही अनेक अधिकार : ॲड.आशुतोष भोसले
आझादी का अमृत महोत्सव कार्यक्रमांतर्गत सदरात केले मार्गदर्शन
इंदापूर : प्रतिनिधी
देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होऊन देखील देशातील नागरिकांना कायद्याविषयी अधिकची माहिती ज्ञात नाही. यासंदर्भात जनजागृती होऊन सर्वसामान्य तळागाळातील लोकांपर्यंत कायद्याविषयी अधिकची माहिती व्हावी या उद्देशाने आझादी का अमृत महोत्सव कार्यक्रमांतर्गत संविधानानुसार आरोपींना असणारे मूलभूत अधिकार या सदराचे आयोजन मंगळवारी ( दि.५) इंदापूर न्यायालयात करण्यात आले होते.
प्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना इंदापूर कोर्टाच्या प्रथमवर्ग न्यायाधीश स्वानंदी वडगावकर म्हणाल्या की,कोरोना काळात झालेल्या जिवीतहानीमुळे अनेकजण अनाथ झालेले आहेत. ओढवलेले आर्थिक संकट आणि कायदेशीर बाबींच्या अपुऱ्या माहितीमुळे अशा लोकांना अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे अशा संकटग्रस्त लोकांकडून परिस्थितीच्या अनुषंगाने न्यायालयात दाखल करण्यात येणाऱ्या खटल्यांबाबत शासन आणि नाल्साच्या माध्यमातून मोफत कायदेशीर मार्गदर्शन आणि वकिलांची नेमणूक करण्यात येणार आहे.
यावेळी बोलताना ॲड.आशुतोष भोसले म्हणाले की, आरोपीला कोणत्या कलमांतर्गत अटक झाली, त्या कलमांचा अर्थ जाणून घेण्याचा आणि घरच्यांशी तसेच वकिलांशी संपर्क करण्याचा अधिकार आहे. तसेच अटकेत असताना शासकीय खर्चातून आवश्यक त्या वैद्यकीय सुविधा मिळवण्याचा आणि पॅरोलवर सुट्टी मिळवण्याचा देखील अधिकार आहे. सोबतच त्यांनी अनेक खटल्यांच्या निकालांचे संदर्भ देत, आरोपी व कैद्यांच्या हक्क व अधिकारासंबंधी मार्गदर्शन केले.
यावेळी बोलताना ॲड. अक्रम आसिफ शेख म्हणाले की, महाविद्यालयीन तरुण तरुणींनी भारतीय संविधानाचे वाचन व कायद्यांचा अभ्यास करून मूलभूत हक्क व अधिकारांची माहिती सर्वांनी आत्मसात करणे गरजेचे आहे. जेणेकरून त्यांना पुढील आयुष्यात वावरताना कोणत्याही प्रकारे अडचणी येणार नाहीत.
सदरील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड.महेश शिंदे यांनी केले.यावेळी इंदापूर बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड.प्रमोद खरात, ॲड.जे.एन पोळ, ॲड.आबासाहेब तोरणे,ॲड.एस.बी पाटील,ॲड.बी.पी जगताप,ॲड.समीरण पोळ, ॲड.एन.एस काळे, ॲड.राकेश शुक्ल,ॲड.प्रवीण बारवकर,ॲड.रवी कोकरे,ॲड.माधव शितोळे,ॲड.संदीप बांदल,ॲड.संज्योत शिंदे,इंदापूर बार असोसिएशनचे सदस्य,कर्मचारी,पक्षकार व अन्य नागरिक उपस्थित होते.