क्राईम रिपोर्ट

भिगवण कथित अपहरण प्रकरणाला नवे वळण; तरुणीचा ‘मी स्वतःहून गेले’चा दावा;नेमकं काय म्हणाले बारामती पोलीस?

आई अन् मुलीची भेट; कोर्टासमोर हजर करून जबाबही नोंदवले

भिगवण कथित अपहरण प्रकरणाला नवे वळण; तरुणीचा ‘मी स्वतःहून गेले’चा दावा;नेमकं काय म्हणाले बारामती पोलीस?

आई अन् मुलीची भेट; कोर्टासमोर हजर करून जबाबही नोंदवले

बारामती वार्तापत्र

इंदापूर तालुक्यातील भिगवण येथील 21 वर्षीय तरुणीच्या अपहरण प्रकरणाने वेगळे आणि मोठे वळण घेतले आहे. 17 फेब्रुवारी मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार करत कुटुंबीयाने मोठा रोष व्यक्त केला होता.

यानंतर भिगवणमध्ये तणावाचे वातावरण होते. मात्र, काही दिवसांनी मुलीचा एक व्हिडीओ समोर आला ज्यामध्ये तिने स्वतःहून मुलासोबत गेल्याचे सांगितले. पण, तरीही तिच्यावर दबाव असल्याची तक्रार कुटुंबीयांनी केली. अशामध्ये, गुरुवारी (19 फेब्रुवारी) मध्यरात्री ही तरुणी स्वतःहून बारामती शहर पोलीस ठाण्यात हजर झाली आहे. यानंतर तिला न्यायालयात हजर केले असता तिथेही मुलीच्या कुटुंबीयांनी गोंधळ घातला. अशामध्ये पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी सर्व प्रकरणाची माहिती दिली आहे.

पत्रकार परिषदेत पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल म्हणाले की, “सदर प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मुलीच्या आई आणि भावाचे म्हणणही ऐकून घेतले आहे. त्या मुलीने आपल्या आई आणि भावासमोर देखील आपले म्हणणे मांडले. पण, तिच्या आई आणि भावाचा वेगळा आरोप असल्याने आम्ही आता आणखी चौकशी करत आहोत. संबंधित तरुणीने कोर्टासमोरही तिची बाजू मांडली आहे. दोघांचीही स्टेटमेंट्स, घटनाक्रम जो सांगितला तो वेगवेगळा आहे. सगळ्यामध्ये तफावत असल्यामुळे आम्ही सखोल तपास करत आहोत. आई आणि मुलीची भेट झाली आहे. त्यांनी आपापसात संवादही केला. पण, मुलीने तिच्या आईकडे जाण्यास नकार दिला,” असे त्यांनी यावेळी स्पष्टपणे सांगितले.

मुलगा आणि मुलगी अपहरण झाल्यानंतर श्रीगोंदा, अहिल्यानगर, शिक्रापूर, पुणे सासवड असा प्रवास करून महाबळेश्वरला गेले होते. महाबळेश्वरवरून मुलगी आणि मुलगा मध्यरात्री 1.30 वाजता बारामती शहर पोलीस ठाण्यात हजर झाले. त्यानंतर आता विविध खुलासे समोर येत आहेत.

पोलिसांनी 5.30 वाजता मुलाला प्रायव्हेट गाडीतून घेऊन गेलेले आहेत. मुलीच्या मित्राला सुरक्षेच्या कारणास्तव अज्ञातस्थळी ठेवण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, तरुणीने एक प्रतिज्ञापत्र तयार केले असून त्यामध्ये “माझे आणि त्यांचे एकमेकांवर प्रेम होते.

मी हे घरच्यांना सांगितले होते. दुसऱ्या मुलांसोबत लग्नास माझा विरोध होता. त्यामुळे संबंधित मुलासोबत मी स्वतःच्या मर्जीने पळून गेलो होतो.” असे म्हंटले आहे. तसेच, मिरचीपूड फेकल्याची घटना घडली नसून आई आणि भावाने खोटे आरोप केल्याचेदेखील या प्रतीज्ञापत्रात म्हटले आहे.

Back to top button