क्राईम रिपोर्ट

भिगवण पोलिसांची दिपावलीपूर्वीची धडाकेबाज कारवाई! अट्टल चोरट्याच्या मुसक्या आवळल्या, 1 लाख रुपयांचा चोरीचा मुद्देमाल हस्तगत

चौकशीत आरोपीने कबूली

भिगवण पोलिसांची दिपावलीपूर्वीची धडाकेबाज कारवाई! अट्टल चोरट्याच्या मुसक्या आवळल्या, 1 लाख रुपयांचा चोरीचा मुद्देमाल हस्तगत

चौकशीत आरोपीने कबुली

इंदापूर;प्रतिनिधि

दिपावलीच्या पार्श्वभूमीवर भिगवण पोलिसांनी प्रभावी पेट्रोलिंग करत अट्टल चोरट्याला गजाआड केले. गणेश गंगाधर टिंगरे (वय 44, रा. लोहार गल्ली, ता. कर्जत, जि. अहमदनगर) असे या सराईत चोरट्याचे नाव आहे.

पोलिसांच्या या कारवाईत तब्बल 1 लाख रुपयांचा चोरीचा मुद्देमाल हस्तगत झाला असून, पोलीस पथकाच्या तत्परतेचे नागरिकांनी कौतुक केले आहे.

संदीपसिंह गिल, पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांच्या आदेशानुसार व गणेश बिरादार, अपर पोलीस अधीक्षक, बारामती विभाग, तसेच डॉ. सुदर्शन राठोड, उपविभागीय पोलीस अधिकारी, बारामती विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली भिगवण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद महांगडे यांनी हद्दीतील सर्व पथकांना सतर्कतेच्या सूचना दिल्या होत्या.

दिनांक 16 ऑक्टोबर 2025 रोजी रात्री सुमारे 7 वाजता अकोले गाव हद्दीत पेट्रोलिंग करत असताना पोलीस अंमलदार महेश उगले, सचिन पवार, संतोष मखरे आणि शहाजी सुद्रीक यांनी एक संशयास्पद मोटारसायकलवर फिरताना पाहिली.

सदर इसमाने आपले नाव गणेश गंगाधर टिंगरे (वय 44, रा. लोहार गल्ली, ता. कर्जत, जि. अहमदनगर) असे सांगितले. त्याच्याकडे असलेल्या स्प्लेंडर मोटारसायकल (एमएच-23 बीई 7395) संदर्भात चौकशी केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. तपासादरम्यान ही मोटारसायकल चोरीची असल्याचे स्पष्ट झाले.

त्याच्या ताब्यातून सुमारे 60 हजार रुपयांची स्प्लेंडर मोटारसायकल आणि इतर वस्तूंनी मिळून एकूण सुमारे 1 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

चौकशीत आरोपीने कबूल केले की, त्याने 13 ऑक्टोबर 2025 रोजी मदनवाडी गावच्या हद्दीतून पियाजो कंपनीची रिक्षा चोरी केली होती. ही रिक्षा देखील पोलिसांनी जप्त केली आहे (किंमत सुमारे 40 हजार रुपये). पुढील तपासात समोर आले की मोटारसायकल काही काळापूर्वी मिरजगाव येथून चोरी झाली होती.

ही कारवाई प्रभारी अधिकारी विनोद महांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार महेश उगले, सचिन पवार, संतोष मखरे व शहाजी सुद्रीक यांनी यशस्वीपणे पार पाडली. पुढील तपास पोलीस अंमलदार महेश उगले करीत आहेत.

भिगवण पोलिसांच्या या तत्पर आणि प्रभावी कारवाईमुळे दिपावलीपूर्व काळात चोरीसारख्या गुन्ह्यांवर अधिक नियंत्रण मिळवण्यात मदत झाली असून, नागरिकांच्या सुरक्षेचा विश्वास अधिक दृढ झाला आहे.

Back to top button