भिमाई आश्रमशाळेतील दीडशेहून अधिक विद्यार्थ्यांना डिजिटल टॅब चे वाटप
स्वयंअध्ययना बरोबरच तंत्रज्ञानाची ओळख होण्यास होणार मदत
भिमाई आश्रमशाळेतील दीडशेहून अधिक विद्यार्थ्यांना डिजिटल टॅब चे वाटप
स्वयंअध्ययना बरोबरच तंत्रज्ञानाची ओळख होण्यास होणार मदत
इंदापूर : प्रतिनिधी
मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्टच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेतील इयत्ता ९ वी ते इ.१२ वीच्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र शासनाच्या उपक्रमाअंतर्गत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण पुणे यांनी दिलेल्या डिजिटल टॅबचे वितरण आश्रमशाळेत छोटेखानी कार्यक्रमात इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्या हस्ते बुधवारी (दि.२०) करण्यात आले.
यावेळी बोलताना तहसिलदार श्रीकांत पाटील म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी व्हावे, म्हणून शासनाच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय अभ्यासक्रमाचा समावेश असलेल्या टॅबचे वाटप करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.त्यातून विद्यार्थ्यांना स्वयंअध्ययना बरोबरच तंत्रज्ञानाची ओळख होण्यास मदत होईल. ऑनलाईन शिक्षणापासून कोणीही वंचित राहू नये तसेच शिक्षकांनी विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण द्यावे असे पाटील यांनी नमूद केले.
पुढे बोलताना ते म्हणाले की, शिक्षण घेत असताना आपण खूप कष्ट करा, मेहनत घ्या व अभ्यास करा. तुमच्या पासून यश कधीच दूर जाणार नाही. तुम्ही मोठे अधिकारी व्हाल.भविष्यात विविध क्षेत्रात काम करताना माणूस म्हणून जीवन जगताना सामाजिक जाणिवेतून पीडित, वंचित, गरीब कष्टकरी, निराधारांना चांगली वागणूक द्या, मदत करा. महापुरुषांची विचारधारा अंगीकारा,त्यांनी दिलेली दिशा आणि विचार आत्मसात करा.ज्या विद्यार्थ्यांना आई-वडील नाहीत, जे निराधार आहेत अशा विद्यार्थ्यांची यादी तयार करुन मला द्या. शासन नियमानुसार मिळणारी आर्थिक मदत त्यांना दिली जाईल अशी सूचना यावेळी पाटील यांनी केली.
प्रसंगी पोलीस उपनिरीक्षक दाजी देठे यांनी मार्गदर्शन केले.कार्यक्रमास संस्थेच्या अध्यक्षा शकुंतला मखरे, सचिव ॲड.समीर मखरे, संचालक गोरख तिकोटे, संजय कांबळे ,ॲड. नितीन राजगुरू, गलांडवाडी नं.२ चे सरपंच गोपीचंद गलांडे, मा. सरपंच विलास शिंदे, संतोष मखरे,दादा चव्हाण,नानासाहेब चव्हाण,पो.ह.पवन भोईटे, पो.नाईक श्री.गायकवाड, संतोष शेंडे, प्रा.युवराज बन तसेच विद्यार्थी व कर्मचारी उपस्थित होते.यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक नानासाहेब सानप यांनी केले तर आभार मुख्याध्यापक साहेबराव पवार यांनी मानले.