भिमाई आश्रम शाळेचे संस्थाचालक व कर्मचाऱ्यांचे गेल्या एक महिन्यापासून प्रशासकीय कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरूच
शासन प्रशासनाकडून अद्याप आंदोलनाची दखल नाही.
भिमाई आश्रम शाळेचे संस्थाचालक व कर्मचाऱ्यांचे गेल्या एक महिन्यापासून प्रशासकीय कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरूच
शासन प्रशासनाकडून अद्याप आंदोलनाची दखल नाही.
इंदापूर:- बारामती वार्तापत्र
इंदापूर प्रशासकीय भवनासमोर दि.५ सप्टेंबर २०२० म्हणजेच “शिक्षकदिना” पासून मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्ट इंदापूर संचलित भिमाई प्राथमिक आश्रमशाळा,क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले माध्यमिक आश्रमशाळा,राजमाता अहिल्यादेवी होळकर कनिष्ठ महाविद्यालय इंदापूर ह्या तीनही विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी व थकीत परिपोषण आहाराचे अनुदान त्वरित मिळावे यासाठी इंदापूरचे माजी नगराध्यक्ष तथा संस्था प्रमुख रत्नाकर मखरे यांच्या नेतृत्वाखाली संस्थेचे संचालक व सर्व कर्मचारी बेमुदत धरणे आंदोलनास बसले आहेत. सदर बेमुदत धरणे आंदोलनाला एक महिना उजाडला तरी उद्यापपर्यंत शासन प्रशासनाने कोणत्याही प्रकारची गांभीर्याने दखल घेतली नाही.
दरम्यानच्या काळात इंदापूर तालुक्याचे लोकप्रतिनिधी तथा राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी एक वेळ आंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलनकर्त्यांच्या मागण्या जाणून घेतल्या,परंतु त्यातूनही काही मार्ग निघाला नाही. सामाजिक न्याय विभाग जाणून बुजून आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत आहे. तसेच वेळकाडूपणा करताना दिसत आहे.असे मखरे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना म्हटले आहे. सामाजिक न्याय विभाग आमच्या मागण्या लवकर मान्य करेल असे चिन्हं दिसत नसल्यामुळे नाईलाजाने आम्हाला मुंबई उच्च न्यायालयात थकीत परिपोषण आहाराचे अनुदान त्वरित मिळावे यासाठी याचिका दाखल करावी लागली. असे प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात आंदोलनकर्ते रत्नाकर मखरे यांनी नमूद केले आहे. कोरोना संदर्भातील शासनाच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करून आंदोलन सुरू असून मागणी केलेल्या सर्व मागण्या मंजूर झाल्याशिवाय कोणत्याही परिस्थितीत आंदोलन मागे घेतले जाणार नाही. असे शेवटी मखरे यांनी म्हटले आहे.