स्थानिक

मद्यधुंद ट्रकचालकाचा बारामती तालुक्यातील माळेगाव-कऱ्हावागज रस्त्यावर हैदोस; ट्रक पलटी, चालक गंभीर जखमी

पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून चालक मद्यधुंद

मद्यधुंद ट्रकचालकाचा बारामती तालुक्यातील माळेगाव-कऱ्हावागज रस्त्यावर हैदोस; ट्रक पलटी, चालक गंभीर जखमी

पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून चालक मद्यधुंद

बारामती वार्तापत्र 

बारामती तालुक्यातील माळेगाव-कऱ्हावागज मार्गावर मद्यधुंद ट्रकचालकाने भरधाव ट्रक चालवत अक्षरशः हैदोस घातल्याची घटना समोर आली आहे. समोरून येणाऱ्या वाहनचालकांनी वेळेत प्रसंगावधान राखल्यामुळे मोठा अनर्थ टळला.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित चालक दारूच्या नशेत ट्रक चालवत होता. भरधाव वेगात असताना त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि ट्रक रस्त्याच्या कडेला पलटी झाला. अपघात इतका भीषण होता की ट्रकचे मोठे नुकसान झाले.

या अपघातात ट्रकचालक गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ट्रकमध्ये चालकासोबत आणखी एक व्यक्ती प्रवास करत असल्याची माहिती समोर आली असून तिचीही चौकशी सुरू आहे.

घटनेनंतर परिसरात काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला. स्थानिक नागरिकांनी आणि वाहनचालकांनी तत्काळ मदतकार्य करत जखमींना बाहेर काढले. सुदैवाने समोरून येणाऱ्या वाहनांनी वेळेत बाजू घेतल्याने मोठी जीवितहानी टळली.

या प्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून चालक मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. चालकाच्या वैद्यकीय तपासणीचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार आहे.

Back to top button