उपमुख्यमंत्री अजित पवारांनी जाहीर सभेत सांगितल्यावर तात्पुरता जनावरांचा बंदोबस्त केला मात्र पुन्हा बारामतीत मोकाट जनावरांचा सुळसुळाट
नागरिक त्रस्त नगरपरिषदेच्या दुर्लक्षामुळे अपघातांचा धोका वाढला

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी जाहीर सभेत सांगितल्यावर तात्पुरता जनावरांचा बंदोबस्त केला मात्र पुन्हा बारामतीत मोकाट जनावरांचा सुळसुळाट
नागरिक त्रस्त नगरपरिषदेच्या दुर्लक्षामुळे अपघातांचा धोका वाढला
बारामती वार्तापत्र
बारामती शहरात मोकाट जनावरांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला असून यामुळे सामान्य नागरिक प्रचंड त्रस्त झाले आहेत. बारामती नगर परिषद शिस्तीच्या नावाखाली वारंवार गोरगरीब नागरिकांवर कारवाई करताना दिसून येते, मात्र मोकाट जनावरांमुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासाकडे नगरपालिका कधी लक्ष देणार, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
शहरातील प्रमुख रस्ते, चौक तसेच अंतर्गत भागांमध्ये मोकाट जनावरे दिवसरात्र मुक्तपणे फिरताना दिसतात. अनेक ठिकाणी ही जनावरे रस्त्याच्या मधोमध बसलेली असतात, तर काही ठिकाणी विचित्र पद्धतीने ये-जा करत असल्याने वाहनचालकांना तासन्तास गाड्या थांबवाव्या लागतात. यामुळे वाहतूक कोंडी होत असून अपघातांचा धोका देखील मोठ्या प्रमाणात वाढला आहे.
मोकाट जनावरांमुळे रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात घाण होत असून स्वच्छतेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. नगरपरिषद स्वच्छतेबाबत नियम कडकपणे राबवत असली तरी या जनावरांमुळे होणाऱ्या अस्वच्छतेवर मात्र ठोस उपाययोजना करताना दिसून येत नाही, अशी नाराजी नागरिकांमध्ये आहे.
नगरपरिषदेने यासाठी कोंडवाडा उभारण्याची घोषणा पूर्वी केली होती. मात्र हा कोंडवाडा नेमका कुठे आहे, त्याचा वापर होतो की नाही, याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. एक ना अनेक समस्यांमुळे नागरिकांमध्ये तीव्र असंतोष व्यक्त केला जात आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी देखील आपल्या भाषणात मोकाट जनावरांवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र प्रत्यक्षात कोणतीही ठोस कारवाई झालेली दिसून येत नसल्याने हे आश्वासन फक्त भाषणापुरतेच मर्यादित होते का, असा सवाल नागरिकांमधून केला जात आहे.
नगरपरिषद आणि प्रशासनाने तातडीने या समस्येकडे लक्ष देऊन मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा, अन्यथा भविष्यात गंभीर अपघात घडण्याची शक्यता नाकारता येणार नाही, अशी मागणी बारामतीतील नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.






