पुणे

मराठीतीली ज्येष्ठ साहित्यिक, विनोदी लेखक आणि कथाकथनकार दत्ताराम मारुती मिरासदार उर्फ द. मा. मिरासदार यांचं वृद्धापकाळाने निधन

ज्येष्ठ साहित्यिक द. मा. मिरासदार यांचं निधन झालं. त्यांना राज्य शासनाचा 2014 यावर्षीचा विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला होता.

मराठीतीली ज्येष्ठ साहित्यिक, विनोदी लेखक आणि कथाकथनकार दत्ताराम मारुती मिरासदार उर्फ द. मा. मिरासदार यांचं वृद्धापकाळाने निधन

ज्येष्ठ साहित्यिक द. मा. मिरासदार यांचं निधन झालं. त्यांना राज्य शासनाचा 2014 यावर्षीचा विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला होता.

पुणे –बारामती वार्तापत्र

कथांमधून बालचमूंपासून वयोवृध्दांना खदखदून हसविणारे, ज्यांच्या गोष्टी रसिकांना खिळवन ठेवतात ते सर्वांचे लाडके ज्येष्ठ साहित्यिक, कथाकथनकार प्रा. द. मा. मिरासदार यांचे वृद्धापकाळाने निधन झालं. त्यांचं वय ९४ वर्ष होतं. आज (शनिवारी) पुण्यात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

कारकीर्दीची सुरुवात पत्रकार म्हणून –

प्रा. द. मा. मिरासदार हे सर्वांमध्ये ‘दादासाहेब’ म्हणून ओळखले जात होते. त्यांचा जन्म सोलापूर जिल्ह्यातील अकलूज या गावी १४ एप्रिल १९२७ साली झाला. त्यांचे शालेय शिक्षण पंढरपूर येथे तर, महाविद्यालयीन शिक्षण पुणे येथे स. प. महाविद्यालयात झाले. त्यांनी आपल्या व्यावसायिक कारकीर्दीची सुरुवात पत्रकार म्हणून केली होती. काही काळ ते ना. सी. फडके संपादित साप्ताहिक ‘झकार’मध्ये लेखन करत होते. १९५२नंतर मात्र, त्यांनी शिक्षक म्हणून पंढरपूर व पुणे येथे काम केले. संभाजीनगरमध्ये देवगिरी महाविद्यालय येथे आणि पुढे गरवारे महाविद्यालय, पुणे येथे ते मराठीचे प्राध्यापक म्हणून कार्यरत राहून निवृत्त झाले. मराठी साहित्यात कथालेखक म्हणून त्यांचे योगदान मोठे आहे. ग्रामीण जीवनावर त्यांनी लिहिलेल्या कथा विशेष गाजल्या. मराठी साहित्यात विनोदी साहित्याची परंपरा मोठी आहे. श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, राम गणेश गडकरी, आचार्य अत्रे, चिं. वि. जोशी, पु. ल. देशपांडे यांनी निर्माण केलेली विनोदी साहित्याची समृध्द परंपरा मिरासदारांनी पुढे चालवली. एवढेच नाही तर ग्रामीण वातावरण आणि विनोदी कथा या दोन धारांना एकत्र आणून एक स्वतंत्र वाट तयार केली. मराठी साहित्याला त्यांनी दिलेली ही मोठी देणगी मानली जाते.

कथाकथनाचे सुमारे १००० हून अधिक कार्यक्रम –

प्रा. द. मा. मिरासदार यांच्या अनेकानेक कथा सामान्य वाचकांबरोबरच जाणकार समीक्षकांच्याही पसंतीची दाद मिळवून गेल्या आहेत. साहित्याच्या क्षेत्राप्रमाणेच मराठी चित्रपटसृष्टीतही त्यांच्या लेखणीचा संचार लक्षणीय ठरला आहे. कथासंग्रहाप्रमाणेच त्यांच्या पटकथा-संवादांनाही शासकीय पारितोषिकांचा सन्मान प्राप्त झाला आहे. ‘कथाकथन’ हा महाराष्ट्रात लोकप्रिय झालेला नवा कलाप्रकार लोकप्रिय करण्यात ज्या तीन लेखकांनी प्रथम पुढाकार घेतला त्यांपैकी ते एक आहेत. त्यांच्या कथाकथनाचे सुमारे १००० हून अधिक कार्यक्रम झाले आहेत.

७१व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष –

एकूण तीसपेक्षा जास्त कथासंग्रह, रूपांतरित कादंबऱ्या आणि मी लाडाची मैना तुमची है वगनाट्य असे लेखने केले. चित्रपट लेखनाच्या क्षेत्रातही त्यांनी मोठी कामगिरी केली असून, एक डाव भुतापाई, ठकास महाठक, गोष्ट धमाल नाम्याची आदी अनेक चित्रपटाच्या पटकथा लिहिल्या. पटकथा संवाद लेखनासाठी त्यांना गदिमा पुरस्कार, अत्रे पुरस्कार, काकासाहेब गाडगीळ त्यांचा राज्य पुरस्कार प्राप्त देण्यात आले होते. परळी वैजनाथ येथे भरलेल्या ७१ व्या साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. महाराष्ट्र पुरस्कार, दीनानाथ राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले. व्यंकटेश माडगुळकर, शंकर पाटील व द. मा. मिरासदार यांनी महाराष्ट्रात देशात आणि परदेशात कथाकथनाचे हजारी कार्यक्रम केले. लेखनाबरोबरच त्यांनी सामाजिक कार्यही केले. अ. भा. विद्यार्थी परिषदेचे ते अनेक वर्षे अध्यक्ष होते. आणीबाणीच्या काळात त्यांनी केलेली भाषणे गाजली. त्यांनी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पुणे शाखेचे अध्यक्षपदही भूषविले. शिवाय संस्कार भारतीचे उपाध्यक्ष म्हणूनही काम पाहिले. साहित्यातील त्याच्या या भरीव योगदानाबद्दल त्यांना विविध पुरस्कारानी गौरविण्यात आले. यामध्ये पुणे महानगरपालिकेचा महषी वाल्मिकी पुरस्कार, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचा विंदा जीवनगौरव पुरस्कार अशा विविध पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!