मला नगराध्यक्षा केलं तर प्रत्येकाला ‘वन बीएचके’ फ्लॅट देणार – काळुराम चौधरी यांची घोषणा
सध्या बारामतीत ३० टक्के विकास होत असताना ७० टक्के भ्रष्टाचार सुरू

मला नगराध्यक्षा केलं तर प्रत्येकाला ‘वन बीएचके’ फ्लॅट देणार – काळुराम चौधरी यांची घोषणा
सध्या बारामतीत ३० टक्के विकास होत असताना ७० टक्के भ्रष्टाचार सुरू
बारामती वार्तापत्र
बारामती नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक राजकारणात चैतन्य निर्माण करणारी घोषणा बहुजन समाज पक्षाच्या वतीने नगराध्यक्ष पदाचे उमेदवार काळुराम चौधरी यांनी केली आहे. नगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल करण्याच्या कार्यक्रमाला ढोल–ताशांच्या गजरात भव्य उपस्थिती लाभली.
शनिवारी चौधरी यांनी बारामती नगरपरिषद कार्यालयात जाऊन अधिकृतरीत्या आपला अर्ज दाखल केला. या वेळी ओबीसी चळवळीतील कार्यकर्ते लक्ष्मण हाके यांच्यासह अनेक समर्थक उपस्थित होते. अर्ज दाखल केल्यानंतर उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित करताना चौधरी यांनी विविध स्थानिक प्रश्नांवर जोरदार भाष्य केले.
ते म्हणाले, “मला जर बारामतीचे नगराध्यक्ष बनवले तर शहरातील प्रत्येक कुटुंबाला ‘वन बीएचके’ फ्लॅट देण्याची जबाबदारी मी स्वीकारतो.” त्यांनी या आश्वासनामुळे जनतेचे जीवनमान उंचावेल आणि घरकुलाची समस्या मोठ्या प्रमाणात सुटेल असे सांगितले.
यावेळी त्यांनी विकासकामांवरून सध्याच्या सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोपही केले. सध्या बारामतीत ३० टक्के विकास होत असताना ७० टक्के भ्रष्टाचार सुरू आहे, असा आरोप त्यांनी केला. शहरातील रस्ते, पाणीपुरवठा, गटारव्यवस्था, गृहनिर्माण यांसारख्या अनेक प्रश्नांवर ते जनतेशी थेट संवाद साधणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
चौधरी यांचे अर्ज दाखल होऊन बारामतीतील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. पुढील काही दिवसांत प्रचाराला अधिक तीव्रता येण्याची शक्यता आहे.






