मस्साजोग चे सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी गलांडवाडीत ‘रास्ता रोको’
धनंजय देशमुख यांचा संवाद

मस्साजोग चे सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी गलांडवाडीत ‘रास्ता रोको’
धनंजय देशमुख यांचा संवाद
इंदापूर प्रतिनिधी –
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात माजी मंत्री धनंजय मुंडे यांना आरोपी करण्याच्या मागणीसाठी शुक्रवारी (दि.7) सकाळी अकरा वाजता सर्वधर्मीय संघटना व सामाजिक कार्यकर्ते यांनी इंदापूर तालुक्यातील गलांडवाडी नंबर 1 येथे पुणे सोलापूर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी या हत्येचा तीव्र शब्दात निषेध करत आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी इंदापूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी निवेदन स्वीकारले. या निवेदनात म्हटले आहे की, मस्साजोग घटनेचा मास्टरमाइंड वाल्मीक कराड व धनंजय मुंडे यांना मुख्य सूत्रधार आरोपी करावे. हत्येचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा.हत्या करणाऱ्या आरोपींना भरचौकात फाशीची शिक्षा शासनाने द्यावी.आरोपींना सहकार्य करणाऱ्यांवरही गुन्हे दाखल करावेत.
धनंजय देशमुख यांचा संवाद
■ या रास्ता रोको वेळी कार्यकर्त्यांनी स्वर्गीय संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय धनंजय देशमुख यांना भ्रमणध्वनीवर संपर्क साधला. यावेळी त्यांनी मार्गदर्शन करताना, ‘येत्या रविवारी बारामती येथे होणाऱ्या मोर्चासाठी येणारा असून, सर्वांनी संतोष अण्णांना न्याय देण्यासाठी जे आंदोलन सुरू केले आहे, ते न्याय मिळेपर्यंत कायम ठेवले जाईल,’ अशी ग्वाही दिली. तसेच साथ दिल्याबद्दल आभार मानले.