महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवड योजना
तीन वर्षामध्ये 75-80 टक्के झाडे जिवंत राहिल्यास लाभार्थी 100 टक्के अनुदानासाठी पात्र राहिल.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवड योजना
तीन वर्षामध्ये 75-80 टक्के झाडे जिवंत राहिल्यास लाभार्थी 100 टक्के अनुदानासाठी पात्र राहिल.
बारामती वार्तापत्र
राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा 2005 अंतर्गत राज्यात महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेची अंमलबजावणी सुरु आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत वैयक्तिक लाभार्त्यांच्या शेतावर कृषि विभागामार्फत फळबाग लागवड कार्यक्रम राबविण्यात येतो. या योजनेअंतर्गत शेतक-यांना बांधावर, पडीक जमीनीवर तसेच सलग फळबाग लागवड करता येते. चालू वर्षी समाधानकारक पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला असून बारामती तालुक्यात मोठया प्रमाणावर फळबाग लागवडीस वाव आहे.
अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, दारिद्रय रेषेखालील लाभार्थी, भू-सुधार योजनेचे लाभार्थी, इंदिरा आवास योजनेचे लाभार्थी, कृषि कर्ज माफी योजना 2008 नुसार अल्प भु-धारक व सीमांत शेतकरी व अनुसूचित जमातीचे व अन्य परंपरागत वन निवासी अधिनियम 2006 नुसार पात्र व्यक्ती या प्रवर्गातील जॉबकार्डधारक शेतक-यांना या योजनेचा लाभ घेता येतो.
योजनेचे निकष पुढीलप्रमाणे – अल्प अत्यल्प भुधारक शेतकरी असणे आवश्यक, लाभार्थी जॉबकार्ड धारक असणे आवश्यक, इच्छुक लाभार्थीनी विहित नमुन्यातील अर्ज ग्रामसेवक /कृषि सहायक यांच्याकडे सादर करणे आवश्यक, ग्रामसभेची मंजूरी /ठराव व लाभार्थींच्या नावे जमीन असणे आवश्यक आहे.
वैयक्तिक शेतावर, बांधावर व पडीक जमीनीवर लावण्यासाठी योजनेत समाविष्ठ केलेली फळबाग व फळपिके, लागवड कालावधी व अनुदान अदा करण्याची कार्यपध्दती याबाबतची माहिती लाभार्थ्यांनी कृषि सहायक, कृषि पर्यवेक्षक व मंडळ कृषि अधिकारी यांच्याकडून घ्यावी.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना तीन वर्षासाठी आहे. तीन वर्षामध्ये 75-80 टक्के झाडे जिवंत राहिल्यास लाभार्थी 100 टक्के अनुदानासाठी पात्र राहिल.
कलमे/रोपे ही शासकीय फळरोपवाटिका, कृषि विद्यापिठांच्या रोपवाटिका, शासन मान्यताप्राप्त खासगी रोपवाटिका, मनरेगा अंतर्गत ग्रामपंचायतींच्या रोपवाटिका व सामाजिक वनीकरण अन्य शासकीय रोपवाटिकामधून उचल करावीत.
या योजनेत बारामती तालुक्यातील जास्तीत जास्त शेतक-यांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन तालुका कृषि अधिकारी, बारामती दत्तात्रय पडवळ यांनी केले आहे.