आपला जिल्हा

महाराष्ट्रच राजकारण ज्या बारामतीतून चालत त्या बारामतीतल्या लोकांना धडा शिकवायला आलोय लक्ष्मण हाके

ओबीसी, एससी-एसटी कार्यकर्त्यांना पाठिंबा

महाराष्ट्रच राजकारण ज्या बारामतीतून चालत त्या बारामतीतल्या लोकांना धडा शिकवायला आलोय लक्ष्मण हाके

ओबीसी, एससी-एसटी कार्यकर्त्यांना पाठिंबा

बारामती वार्तापत्र 

महाराष्ट्रातील पंचायत समिती जिल्हा परिषदेत घराणेशाहीने कब्जा केला असून, वर्षानुवर्षे सामाजिक व राजकीय काम करणाऱ्या सामान्य कार्यकर्त्यांचा आवाज दाबला जात असल्याचा गंभीर आरोप ओबीसी आंदोलनाचे नेते लक्ष्मण हाके यांनी बारामतीमध्ये केला आहे.

या निवडणुका कार्यकर्त्यांच्या असतात, नेत्यांच्या कुटुंबीयांसाठी नाहीत, असे ठाम मत व्यक्त करत त्यांनी बारामतीत जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका लढवण्याची घोषणा केली आहे.

हाके म्हणाले की,आज राज्यात मोठ्या प्रमाणावर नेते आपल्या पत्नी, भावजय, भाऊ, काका, मामा, मुले आणि पुढील पिढ्यांना थेट निवडणुकांमध्ये उतरवत आहेत. ज्या बारामतीतून राजकारण चालतं त्या बारामतीतल्या लोकांना धडा शिकवायला आलो आहे. त्यामुळे जे कार्यकर्ते वर्षानुवर्षे पक्षासाठी झटले, त्यांची नेतृत्वाची संधी जन्माला येण्याआधीच संपवली जात आहे. ही प्रक्रिया म्हणजे कार्यकर्त्यांची राजकीय ‘भ्रूणहत्या’ असल्याची तीव्र टीका त्यांनी केली.

ओबीसी, एससी-एसटी कार्यकर्त्यांना पाठिंबा

आपण ओबीसी आंदोलनातून आलेलो असून आतापर्यंत सामाजिक काम करत आलो, मात्र आता राजकीय भूमिका घेणे अपरिहार्य झाल्याचे हाके यांनी स्पष्ट केले. बीड, जालना, नांदेड, परभणीसह सुमारे बारा जिल्ह्यांतील जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये ओबीसी, एससी-एसटी आणि वंचित घटकांतील कार्यकर्त्यांना पाठिंबा देत थेट निवडणुकीच्या रणांगणात उतरणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पवार कुटुंबावर थेट हल्ला

महाराष्ट्रातील विरोधकांची भूमिका अस्पष्ट असल्याची टीका करताना हाके यांनी पवार कुटुंबावर जोरदार टीका केली. अजित पवार आणि शरद पवार यांनी वेळोवेळी ‘दोन्ही बाजूंना सांभाळून घेण्याची’ भूमिका घेतल्यामुळे जनतेने त्यांना योग्य जागा दाखवून दिल्याचा दावा त्यांनी केला.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर जरांगे पाटलांना पाठिंबा देताना ओबीसी समाजाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत, ओबीसी व दलित मिळून राज्यातील 70 ते 80 टक्के लोकसंख्या असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

पिंपरी-चिंचवड, पुणे, मुंबईत जनतेचा संदेश

भुजबळ रणांगणात दिसले नाहीत, धनंजय मुंडेंना बाजूला सारले गेले, याकडे लक्ष वेधत हाके म्हणाले की, पिंपरी-चिंचवड, पुणे आणि मुंबईत जनतेने राष्ट्रवादीला स्पष्ट संदेश दिला आहे. अनेक नगरपरिषदांमध्ये राष्ट्रवादीचा ‘नारळही फुटला नाही’, तर वंचित बहुजन आघाडी व एमआयएमचा प्रभाव तुलनेत अधिक राहिल्याचा दावा त्यांनी केला.

बारामतीचा ‘विकास मॉडेल’ प्रश्नांकित

बारामती हे देशाला आदर्श म्हणून दाखवले जाते, मात्र प्रत्यक्षात जिरायती भागातील गावांमध्ये रोजगार, पाणी, रस्ते आणि शेतीचे गंभीर प्रश्न असल्याचे हाके यांनी सांगितले. वडगाव निंबाळकर, चोपडज वाकी आदी गावांमध्ये नागरिक मूलभूत सुविधांसाठी झगडत असल्याचे त्यांनी नमूद केले.

“हेच का बारामती?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

‘बारामती परिवर्तन आघाडी’ची घोषणा

घराणेशाही आणि सत्ताधारी राजकारणाविरोधात लढण्यासाठी हाके यांनी ‘बारामती परिवर्तन आघाडी’ स्थापन करण्याची घोषणा केली. या आघाडीच्या माध्यमातून सर्व संघर्षशील कार्यकर्ते, पक्ष आणि संघटनांना एकत्र आणून पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकांत सर्व जागा लढवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
“आम्ही पैशाला, पदाला किंवा सत्तेला घाबरणारे नाही. प्रामाणिकपणे लढणाऱ्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहू,” असे सांगत हाके यांनी बारामतीकरांना थेट आवाहन केले. येणाऱ्या निवडणुकांत या संघर्षाचा परिणाम जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत स्पष्टपणे दिसेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Back to top button