महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड! पवारविरुद्ध पवार संघर्ष संपला; महानगरपालिकेनंतर ZP निवडणुकीतही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र
जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत काका-पुतणे एकत्र येणार?

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड! पवारविरुद्ध पवार संघर्ष संपला; महानगरपालिकेनंतर ZP निवडणुकीतही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र
जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत काका-पुतणे एकत्र येणार?
बारामती वार्तापत्र
लोकसभा विधानसभा निवडणुकीत पवारविरुद्ध पवार असा संघर्ष आपण पाहिला होता, मात्र आता पवारविरुद्ध पवार लढत होणार नसून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत निवडणूक लढवणार असल्याचे संकेत मिळू लागले आहेत. आज बारामतीच्या गोविंद बागेत शरद पवारांचं निवासस्थान असलेल्या गोविंद बागेत दोन्ही पवारांमध्ये जवळपास दीड तास चर्चा झाली आहे. आगामी जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीच्या निवडणुक पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा पवार एकत्र आलेत.
राष्ट्रवादी शप गटाचे खासदार अमोल कोल्हे, सुप्रिया सुळे या आधीपासूनच गोविंदबागेत असल्याने चर्चांना उधाण आले आहे.
पुणे महानगरपालिकेत भाजपने पुन्हा एकदा एकहाती सत्ता मिळवत १२० जागांवर विजय मिळवला आहे. या निवडणुकीत शरद पवार आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने एकत्र येत लढा दिला होता. या धक्कादायक निकालानंतर दोन्ही नेत्यांमध्ये होणारी ही पहिलीच भेट आहे. ही भेट कौटुंबिक नसून यामागे काही मोठे राजकीय संकेत दडलेले आहेत, यावर सध्या राजकीय वर्तुळात खमंग चर्चा रंगली आहे.
कार्यकर्त्यांची धाकधूक वाढली
अजित पवार गोविंदबागेत पोहोचताच बारामतीसह संपूर्ण पुण्यात कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जमली आहे. या भेटीदरम्यान राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या भविष्यातील वाटचालीवर किंवा महापालिकेत मिळून विरोधी पक्ष म्हणून काम करण्यावर चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अजित पवार आणि शरद पवार पक्ष एकत्र येण्याची देखील शक्यता आहे. राज्यात आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका आहेत. यामुळे भाजपला टक्कर द्यायची असेल, अस्तित्व टिकवायचे असेल तर दोन्ही पक्षांना एकत्र येण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही.
पवार कुटुंब एकत्र…!
बारामती मध्ये कृषीक 2026 चे कृषी प्रात्यक्षिकावर आधारित कृषी प्रदर्शन पार पडत आहे 17 ते 24 जानेवारी दरम्यान हे प्रदर्शन पार पाडणार आहे. याचा उद्घाटन माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे खासदार सुप्रिया सुळे खासदार सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत पार पडल आहे. या निमित्ताने पुन्हा एकदा बारामतीत पवार कुटुंब एकत्र आल्याच पाहायला मिळाले.
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा कार्यक्रम
- अर्ज दाखल करण्याची तारीख – 16 जानेवारी ते 21 जानेवारी.
- अर्जांची छाननी – 22 जानेवारी
- उमेदवारी माघारीची अंतिम मुदत – 27 जानेवारी, दुपारी 3 वाजेपर्यंत.
- निवडणूक चिन्ह आणि अंतिम उमेदवार यादी – 27 जानेवारी दुपारी 3.30 वाजेनंतर जाहीर केली जाईल.
- मतदानाचा दिनांक – 5 फेब्रुवारी सकाळी 7 ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत असेल.
- मत मोजणी आणि निकाल – 7 फेब्रुवारी सकाळी 10 वाजल्यापासून.






