महाशिवरात्र निमित्त श्री सिद्धेश्वर मंदिर, बारामती येथे भव्य महोत्सव
बारामतीच्या ग्रामदैवताचा ७८६ वर्षांचा वैभवशाली इतिहास

महाशिवरात्र निमित्त श्री सिद्धेश्वर मंदिर, बारामती येथे भव्य महोत्सव
बारामतीच्या ग्रामदैवताचा ७८६ वर्षांचा वैभवशाली इतिहास
बारामती वार्तापत्र
बारामती हे शहर राजकीय घडामोडींमुळे राज्यभर परिचित असले तरी कऱ्हा नदीच्या शांत किनाऱ्यावर वसलेले हे ठिकाण समृद्ध आध्यात्मिक आणि ऐतिहासिक वारशाने नटलेले आहे.
कऱ्हा नदीच्या उगमस्थानापासून संगमापर्यंत १२ ज्योतिर्लिंगांचा उल्लेख आढळतो. त्यापैकी बारामतीचे ग्रामदैवत असलेले श्री सिद्धेश्वर मंदिर हे विशेष महत्त्वाचे मानले जाते. या प्राचीन देवस्थानाला यंदा तब्बल ७८६ वर्षे पूर्ण झाली आहेत.
हेमाडपंती स्थापत्याचा अद्वितीय नमुना यादव काळात बांधलेले हे मंदिर हेमाडपंती स्थापत्यशैलीचे उत्कृष्ट उदाहरण आहे. दगडी घडीव बांधकाम, सूक्ष्म शिल्पकला आणि मजबूत रचना ही या मंदिराची वैशिष्ट्ये आहेत.
इतिहासातील उल्लेखांनुसार, यादव घराण्यातील राजा रामदेवराय यादव यांनी इ.स. ११४७ मध्ये मंदिराच्या बांधकामास सुरुवात केली. सुमारे नव्वद वर्षांच्या कालावधीनंतर इ.स. १२३७ मध्ये हे बांधकाम पूर्णत्वास गेले.
मंदिरातील अखंड शिवलिंग आणि अखंड दगडात कोरलेला देखणा नंदी ही प्रमुख आकर्षणे आहेत. मंदिराच्या कळसाखाली ध्यानधारणेसाठी खास जागा असून तेथे पूर्वी महादेवाची पिंड होती. दुसऱ्या सभामंडपात कासवाखाली कोरलेली नक्षी स्थापत्यकलेचे अप्रतिम दर्शन घडवते.
थोरामोठ्यांच्या भेटींचा साक्षीदार या मंदिराला अनेक संत आणि ऐतिहासिक व्यक्तींनी भेट दिल्याचा उल्लेख आढळतो.
त्यामध्ये संत ज्ञानेश्वर,संत तुकाराम, शहाजी राजे भोसले,छत्रपती शिवाजी महाराज,छत्रपती संभाजी महाराज,
मोरोपंत यांसारख्या थोर व्यक्तींचा समावेश आहे. संत ज्ञानेश्वरांनी येथे गणपतीची मूर्ती स्थापित केल्याचे सांगितले जाते.
तसेच मोरोपंत आणि श्रीधरस्वामी यांनी मंदिर परिसरात बसून लेखन केले होते. पूर्वी संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा मुक्कामदेखील याच मंदिरात होत असे.
पेशवेकालीन सनद आणि दाते कुटुंबाची सेवा शिवकालानंतर पहिले बाजीराव पेशवे यांनी मंदिराची व्यवस्था पांडुरंग दाते यांच्याकडे सोपविली. तेव्हापासून आजतागायत दाते कुटुंब सिद्धेश्वराची सेवा करत आहे. सध्या दाते घराण्याची बारावी पिढी देवसेवेत कार्यरत आहे.
इ.स. १७२३ मध्ये बाळाजी विश्वनाथ भट यांनी मोडी लिपीत
मंदिरासंदर्भातील सनद लिहून दिली होती. ही ऐतिहासिक सनद आजही दाते कुटुंबाकडे जतन केलेली आहे.
महाशिवरात्र उत्सवाची परंपरा दरवर्षी महाशिवरात्र निमित्त येथे भव्य महोत्सव आयोजित केला जातो. विविध नामवंत कीर्तनकारांना निमंत्रित केले जाते. राज्यभरातून तसेच इतर भागांतून हजारो भाविक दर्शनासाठी येतात. धार्मिक विधी, अभिषेक, कीर्तन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण होते.
चौकट :
नंदीचे अप्रतिम शिल्प सिद्धेश्वर मंदिरातील नंदी हा स्थापत्यकलेचा अद्वितीय नमुना आहे.
अखंड दगडात कोरलेले सालंकृत रूप, आरामदायी बैठक आणि चपळ भाव यामुळे तो विशेष आकर्षक वाटतो.
नंदीच्या अंगावर दगडात कोरलेली झूल व घुंगरांची नक्षी
एक कान पाहणाऱ्याकडे, तर दुसरा महादेवांकडे वळलेला
१२ फूट लांब व १२ फूट रुंद ओटा अडीच फूट उंच जोता, तीन कप्प्यांत रचना नंदीची उंची ६ फूट सव्वा फूट उंचीची शिंगे, ११ इंचांचे कान गळ्यात ५ इंचांची घंटी व ५० घुंगरांचा बाजूबंद
१३ दगडी कमानींची मेघडंबरी चारही बाजूंना हनुमान व नक्षीकाम केलेले खांब ही संपूर्ण रचना प्राचीन शिल्पकारांच्या कौशल्याची साक्ष देते.
चौकट :
वारसा जपण्याचा संकल्प मंदिर परिसरात कार्तिक स्वामी, दत्त महाराज, हनुमान, विठ्ठल-रुक्मिणी, कालभैरवनाथ, महाकाली, नरसिंह, परशुराम, संतोषी माता, गोंदवलेकर महाराज, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर आदींची लहान मंदिरे भाविकांच्या इच्छेनुसार उभारण्यात आली आहेत.
“सिद्धेश्वर मंदिराला ऐतिहासिक परंपरा आहे. याचे जतन करण्याचा प्रयत्न आम्ही सातत्याने करीत आहोत. वारसाप्रेमींच्या सहकार्यामुळे हा पुरातन ठेवा आजही सुस्थितीत आहे.
सिद्धेश्वर मंदिर म्हणजे बारामतीच्या वैभवशाली अध्यात्मिक इतिहासाचा साक्षीदार आहे,” असे मुख्य विश्वस्त समीर दाते यांनी सांगितले.






