रेमडेसिवीर औषध मिळेना; बारामतीत रुग्णांच्या नातेवाईकांची फरफट
पुन्हा एकदा शहरातील खासगी रुग्णालयांकडून इंजेक्शनची मागणी वाढू लागली

रेमडेसिवीर औषध मिळेना; बारामतीत रुग्णांच्या नातेवाईकांची फरफट
पुन्हा एकदा शहरातील खासगी रुग्णालयांकडून इंजेक्शनची मागणी वाढू लागली
बारामती वार्तापत्र
मागील काही दिवसांपासून बारामतीत कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. शहरात गंभीर, तसेच ऑक्सिजनवर असलेल्या रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. गंभीर अवस्थेत असणाऱ्या या रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी रेमडेसिवीर या औषधीच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. हे औषध घेण्यासाठी रुग्णांचे नातेवाईक औषधांच्या दुकानात मोठ्या संख्येने गर्दी करताना दिसत आहे.
काही मोजक्याच औषधांच्या दुकानात मिळणार्या या रेमडेसिवीर औषधीसाठी रुग्णांचे नातेवाईक मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहे. बारामतीतल प्रसिद्ध रुग्णालयातील मेडिकलमध्येही हे औषध उपलब्ध नसल्याचे चित्र आहे. हे औषध घेण्यासाठी पुणे जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागातून नागरिक या ठिकाणी सकाळपासून गर्दी करत आहेत. कुणाचा भाऊ, कुणाचे वडील, तर कुणाचे इतर नातेवाईक कोरोनामुळे रुग्णालयात भरती असताना त्यांच्यासाठी रेमडेसिवीर औषध घेण्यासाठी नातेवाईक तासनतास याठिकाणी रांगेत उभे आहेत.
मागील वर्षी कोरोनाची तिव्रता वाढली असताना जून ते ऑक्टोबर या कालावधीत रेमडेसिवीर या इंजेक्शनला प्रचंड मागणी होती. त्यावेळी आधार कार्ड आणि डॉक्टरांच्या प्रेस्क्रिप्शनच्या आधारे रुग्णाच्या नातेवाईकांना सहा इंजेक्शन देण्यात येत होते. परंतु, मागणी आणि पुरवठ्याचे समीकरण बिघडल्याने रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार सुरू झाला होता. तीच परिस्थिती पुन्हा एकदा निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे कारण फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून पुन्हा एकदा बारामतीतत कोरोना संसर्गाची तिव्रता वाढली आहे. त्यामुळे, रुग्णसंख्या वाढल्याने गंभीर आणि ऑक्सिजनवर असणाऱ्या रुग्णांची संख्या देखील झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे, पुन्हा एकदा शहरातील खासगी रुग्णालयांकडून इंजेक्शनची मागणी वाढू लागली आहे.