माजी सरपंच जयदीप तावरे यांच्यावरील गुन्हा माघे घेण्याच्या मागणीकरिता माळेगाव बंद.
माळेगाव नगरपंचायत झाल्यापासून माळेगावातील शांतता धोक्यात
माजी सरपंच जयदीप तावरे यांच्यावरील गुन्हा माघे घेण्याच्या मागणीकरिता माळेगाव बंद.
माळेगाव नगरपंचायत झाल्यापासून माळेगावातील शांतता धोक्यात
बारामती वार्तापत्र
माळेगाव मध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला होता . यानंतर ग्रामस्थांनी रस्त्यावर येऊन निषेध सभेचे आयोजन केले. यामध्ये राष्ट्रवादीचे पदाधिकारी देखील सहभागी होते. या पदाधिकाऱ्यांनी जे दोषी आहेत, त्यांच्यावर कारवाई करा, मात्र विनाकारण उगीचच नाव घेऊन खोट्या फिर्यादी देऊन लोकांवर कारवाई करू नका अशी मागणी केली. प्रशासकांना सांगून माझे अजितदादांशी संबंध आहेत असे सांगून अनेक बिले काढली गेली आहेत असा आरोप यावेळी बोलताना पदाधिकाऱ्यांनी केला.ग्रामस्थांनी निषेध सभा घेतली. तावरे यांना न्याय मिळावा, यासाठी पोलिसांना निवेदन देण्यात आले.
तावरे यांना अटक करताच गावांमधील राजकारण उफाळून आले आणि आज गावकऱ्यांनी कडकडीत बंद पाळला.. फक्त बंद पाळला नाही, तर ग्रामस्थांना रस्त्यावर घेऊन पदाधिकाऱ्यांनी रविराज तावरे यांच्यावर टीका करत त्यांच्या कारभाराच्या चौकशीची मागणी केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी सलगी असल्याचे दाखवत रविराज तावरे यांनी गावात अनागोंदी केल्याचा ठपका या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या भाषणात ठेवला.
‘‘रविराज तावरे यांनी गाळीबार प्रकरणात राजकीय आकसापोटी जयदीप तावरे यांच्या विरुद्ध खोटा जबाब दिला आहे. त्या घटनेची शहानिशा न करता पोलिसांनी जयदीप यांच्याविरुद्ध केलेली पोलिस कारवाई अन्यायकारक आहे. या घटनेला वाचा फोडण्यासाठी आज निषेध सभा घेतली आहे,’’ अशी माहिती बाजार समितीचे माजी सभापती धनवान वदक यांनी निषेध सभेत सांगितली.
बारामती तालुक्यातील माळेगाव बुद्रूक येथील राष्ट्रवादीचे कायकर्ते रविराज तावरे यांच्यावर ता. ३१ मे रोजी गोळीबार झाल्याने पोलिसांनी सुरुवातीला चार आरोपींवर संघटीत गुन्हेगारी कायद्यांतर्गत (मोका) गुन्हा दाखल केला होता. तसेच, संबंधित आरोपींना पोलिसांनी अटकही केली होती. पण, जखमी रविराज यांच्या प्रकृतीत सुधारणा होताच पोलिसांनी या गुन्ह्याबाबत त्यांचा जबाब नोंदविला. त्यात त्यांनी जयदीप तावरे हे गोळीबार करणाऱ्या आरोपींच्या कटकारस्थानात सहभागी होते, असा उल्लेख केल्याने पोलिसांनी जयदीप तावरे यांना मंगळवारी (ता. ६ जुलै) अटक केली होती. त्यानंतरच्या कालावधीत गावात पुन्हा तणावाची स्थिती निर्माण झाली होती.
गोळीबार प्रकरणाचा निःपक्षपातीपणे तपास करावा : दीपक तावरे
माळेगावमध्ये रविराज तावरे यांच्यावर गोळीबार झाला, ही गोष्ट निंदनिय आहे. या गोळीबार प्रकरणात सुरवातीला पकडलेल्या गुन्हेगारांवर पोलिसांनी कडक कारवाई केली. त्याबाबत कोणाचेच दुमत नव्हते;परंतु राजकिय आकसापोटी जयदीप तावरे यांना अटक झाल्याने गावात तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. ही तणावाची स्थिती संपविण्यासाठी खरेतर पोलिसांनी निःपक्षपातीपणे गोळीबार प्रकरणाचा तपास करावा. गावकरी म्हणून आम्ही गावात शांतता बाळगतो, अशी भूमिका दीपक तावरे यांनी स्पष्ट केली.
पोलिसांना त्यांचे काम करू द्यावे
माळेगाव गोळीबार प्रकरणाचा तपास दिवसेंदिवस पुढे जात असताना गावात मात्र तणावाची स्थिती निर्माण होऊ पाहत आहे. त्याची दखल वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेतली असून गावात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, या उद्देशाने चोख पोलिस बंदोबस्त ठेवला आहे. पोलिसांना त्यांचे काम करू द्यावे. कोणावरही विनाकारण अन्याय होणार नाही, याची काळजी आम्ही घेत असून तशापद्धतीने गोळीबार प्रकरणाच्या तपासाची दिशा पुढे जात आहे. गावकऱ्यांनी सहकाऱ्यांची भूमिका ठेवावी, असे आवाहन पोलिस निरीक्षक महेश ढवाण यांनी केले.
या वेळी संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष धनवान वदक,पंचायत समितीचे माजी सदस्य दीपक तावरे, जिल्हा बँकेचे माजी संचालक दत्तात्रय येळे,माजी सरपंच दिलीप तावरे, राष्टवादीचे युवा नेते बंटी भैय्या तावरे, माजी उपसरपंच शिवराज जाधवराव,राजेंद्र तावरे,सामाजिक कार्यकर्त्या रुक्मिणी लोणकर आदीसह मोठया संख्येने जनसमुदाय उपस्थित होता.