माझी वसुंधरा अभियानांतर्गत बारामती नगरपरिषदेचे पहिल्या 10 मध्ये स्थान
नगरपरिषदेने केले ऑनलाईन सादरीकरण
माझी वसुंधरा अभियानांतर्गत बारामती नगरपरिषदेचे पहिल्या 10 मध्ये स्थान
नगरपरिषदेने केले ऑनलाईन सादरीकरण
बारामती वार्तापत्र
राज्य शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाकडून ऑक्टोबर 2020 पासून सुरू केलेल्या माझी वसुंधरा अभियानात बारामती नगरपरिषदेने नगरपरिषद या वर्गवारीमध्ये पहिल्या 10 मध्ये स्थान पटकावले आहे. माझी वसुंधरा अभियान ऑक्टोबर 2020 ते फेब्रुवारी 2021 आणि 01 मार्च ते 15 एप्रिल 2021 अशा दोन टप्प्यामध्ये संपूर्ण राज्यभरात राबविण्यात आले. माझी वसुंधरा अभियानांतर्गत केलेल्या कामाचे मूल्यांकन (डेस्कटॉप असेसमेंट ) राज्य शासनाने नेमलेल्या त्रयस्थ संस्थेमार्फत करण्यात आले. यामध्ये पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश या निसर्गातील पंचतत्वांना अनुसरून कामाची विभागणी केली गेली होती. मात्र कोरोना महामारीमुळे लागू असलेल्या निर्बंधामुळे अभियान कालावधीत केलेल्या कामाची प्रत्यक्ष पाहणी करणे शक्य झाले नाही. त्यामुळे शासनातर्फे नेमलेल्या त्रिसदस्यीय समितीने पहिल्या दहा शहरांची दृकश्राव्य पध्दतीने ऑनलाईन सादरीकरण पाहून तसेच व्हिडीओ टूरव्दारा पाहणी करून कामाचे अंतिम मूल्यांकन केले.
पृथ्वी तत्वांतर्गत 12300 झाडांची लागवड करण्यात आली. त्यामध्ये 7480 प्रजातींच्या झाडांची लागवड केली. वायूतत्वांतर्गत जानेवारी ते मार्च दरम्यान एकूण नऊ ठिकाणच्या हवेच्या नमुन्यांचे परिक्षणे करण्यात आले. बारामती शहराचा वायू गुणवत्ता निर्देशांक म्हणजेच AQI हा 54 ते 65 यादरम्याण म्हणजेच मध्यम वायू गुणवत्ता या गटात येतो. सदरील कालावधीमध्ये शहरामधील रस्त्यांच्या दुतर्फा हरितीकरण करण्यात आले आहे. पेट्रोलियम बेस्ड इंधनाच्या वापरामुळे होणाऱ्या प्रदूषणाबाबत जनजागृती करून समाजप्रबोधन करणेकामी शहरामध्ये सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. जल तत्वांतर्गत 355 दशलक्ष लिटर आणि 128 दशलक्ष लिटर असे दोन साठवण तलाव कार्यरत असून 165 दशलक्ष लिटर क्षमतेच्या तिसऱ्या साठवण तलावाचे काम प्रगतीपथावर आहे. याचसोबत शहरामध्ये 11.5 दशलक्ष लिटर प्रतिदिन क्षमतेचा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प सध्या कार्यरत असून प्रतिदिन 11 दशलक्ष लिटर क्षमतेचे 3 सांडपाणी प्रकल्प (STP Plant) प्रस्तावित आहेत. अग्नी या तत्वांतर्गत 60 किलोवॅट क्षमतेचे सोलर पॅनल नगरपरिषद कार्यालयावर स्थापित करण्यात आले आहेत. तसेच आकाश या तत्वांतर्गत पर्यावरण संवर्धन आणि संरक्षण या गोष्टींचे महत्व वेगवेगळ्या सामाजिक माध्यमांव्दारे नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. अनेकांत व्यवस्थापन महाविद्यालय यांच्या सहकार्याने अभियानाचा प्रसार करण्याकरिता तसेच जास्तीत जास्त नागरिकांनी हरित शपथ घेण्याच्या हेतूने सिटीजन व्हॉईस सर्वे घेण्यात आला. बारामती शहरातील सर्व मॉल्स, शासकीय, निमशासकीय, तसेच खाजगी आस्थापना, व्यापारी महासंघ आणि शहरातील विविध शाळा , महाविद्यालये येथे नगरपरिषदेमार्फत वसुंधरा दूत पाठवून अभियानाची सविस्तर माहिती सांगून हरित शपथ घेण्याकरीता प्रोत्साहित करून हरित शपथ देण्यात आली.
राज्यातील प्रथम दहा शहरांना फील्ड असेसमेंटकरिता ऑनलाईन पध्दतीने सादरीकरण करण्याबाबत अभियान संचालकांनी कळविले त्यास अनुसरून 29 मे 2021 रोजी फिल्ड असेसमेंटकरिता बारामती नगरपरिषदेचे मुख्याधिकारी किरणराज यादव यांनी सादरीकरण केले. व्हिडीओ टूर करिता नगरपरिषदेच्या अधिकारी व कर्मचारी यांनी प्रत्यक्ष स्थळावर उपस्थित राहून व्हिडीओव्दारा माझी वसुंधरा अभियानाशी संलग्नित काम दाखविले. हे सादरीकरण तयार करणेकामी अनेकांत व्यवस्थापन महाविद्यालयाचे संचालक डॉ. सलीम लाहोरी, प्रा.डॉ.अभिषेक दिक्षित, प्रा.डॉ. उमेश कोळीळमठ यांचे सहकार्य लाभले.