माढा तालुक्यात पूरग्रस्तांसाठी इंदापुरातून मदतीचा हात
मानवतेची भावना खरोखरच प्रेरणादायी...

माढा तालुक्यात पूरग्रस्तांसाठी इंदापुरातून मदतीचा हात
मानवतेची भावना खरोखरच प्रेरणादायी…
इंदापूर, आदित्य बोराटे –
सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील दारफळ, बरडवस्ती, राहुलनगर (सुलतानपूर) या गावांना सीना नदीला आलेल्या महापुराचा मोठा फटका बसला आहे. पूरग्रस्त कुटुंबांना दिलासा देण्यासाठी पतंजली योग समिती, राष्ट्र सेवा दल,नागरी संघर्ष समिती यांच्या संयुक्त विद्यमाने मदतीचे वाटप करण्यात आले.
महापुरामुळे नदीकाठावरील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. अनेकांचे संसार वाहून गेले. अशा कठीण प्रसंगात इंदापुरातील दानशूर व्यक्तींनी पुढाकार घेत जीवनावश्यक साहित्य गोळा केले. या माध्यमातून दोनशे साड्या,शंभर डझन वह्या,सहाशे पेन,सातशे किलो गव्हाचे पीठ,चारशे किलो तांदूळ,तीनशे किलो गहू,तीनशे ब्लॅंकेट, खाद्यतेल, शेंगदाणे, डाळी,लहान मुलांचे कपडे वाटप करण्यात आले.
प्रेरणादायी आवाहन
संकटाच्या या काळात इंदापूरच्या नागरिकांनी दाखवलेली एकजूट आणि मानवतेची भावना खरोखरच प्रेरणादायी आहे. अशा संकटसमयी प्रत्येकाने आपल्या परीने मदत करण्यासाठी पुढे यावे, मग ती आर्थिक, सामग्री किंवा श्रमदानाच्या स्वरूपात असो. सिना नदीच्या महापुराने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान केले आहे, अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. अशा वेळी आपण सर्वांनी एकत्र येऊन पूरग्रस्त बांधवांना आधार देण्याची गरज आहे. इंदापूरच्या या उपक्रमाने इतर शहरांनाही प्रेरणा मिळेल, अशी आशा आहे. चला, एकमेकांच्या पाठीशी उभे राहून मानवतेचा हा दीप उजळवूया!
या कार्यात नागरी संघर्ष समितीचे प्रा. कृष्णा ताटे, बाळासाहेब क्षिरसागर, हामिद आतार, रमेश शिंदे, संदिपान कडवळे; पतंजली योग समितीचे अध्यक्ष मल्हारी घाडगे, रविंद्र परबत, अशोक अनपट, डॉ. रविंद्र काळे, प्रशांत गिड्डे, गणेश दरंगे, किसन पवार, देवराव मते, चंद्रकांत देवकर, ज्ञानेश्वर घोगरे, सायरा आत्तार आदींनी सहभाग घेतला.सामाजिक बांधिलकी जपत विविध संस्थांनी केलेल्या मदतीमुळे पूग्रस्तांना मोठा आधार मिळाला.