माळेगावात DJ चा दणदणाट पडला महागात! दहीहंडी संघातील चौघांवर गुन्हा; दोन वाहने जप्त
प्रतिबंधात्मक आदेश झुगारला; चिथावणीखोर गाण्यांनी वातावरण तापवण्याचा आरोप

माळेगावात DJ चा दणदणाट पडला महागात! दहीहंडी संघातील चौघांवर गुन्हा; दोन वाहने जप्त
प्रतिबंधात्मक आदेश झुगारला; चिथावणीखोर गाण्यांनी वातावरण तापवण्याचा आरोप
माळेगाव; प्रतिनिधि
दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांनी दिलेल्या सूचनांकडे दुर्लक्ष करून विनापरवाना DJ वाजवणे चौघांना चांगलेच महागात पडले. माळेगाव येथील पिरदर्गा मैदानावर विनापरवाना DJ वाजवून सार्वजनिक शांतता व कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केल्याप्रकरणी चौघांविरुद्ध माळेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
दि. ५ सप्टेंबर रोजी दुपारी सुमारे १२.३० वाजता पिरदर्गा मैदान येथे काही जणांनी दहीहंडी संघ एकत्र करून विनापरवाना DJ वाजविल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. तसेच चिथावणीखोर स्वरूपाची गाणी वाजवून एकमेकांना खुन्नस देत सार्वजनिक शांततेचा भंग होण्याची परिस्थिती निर्माण केल्याचा आरोप आहे.
यापूर्वी मा. जिल्हाधिकारी, पुणे यांनी जारी केलेल्या प्रतिबंधात्मक आदेशांचे पालन करण्याबाबत तसेच माळेगाव पोलिसांनी दिलेल्या लेखी नोटिसीचे पालन करण्याबाबत संबंधितांना सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, या आदेशांचे उल्लंघन झाल्याचे आढळून आल्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई केली.
या प्रकरणी केशव गुलाब भोसले, जयपाल भालचंद्र भोसले, रमेश भाऊसो गव्हाणे (सर्व रा. माळेगाव बुद्रुक) आणि परशुराम केरू गडदे (रा. चौफुला, ता. दौंड) यांच्याविरुद्ध माळेगाव पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नं. २३१/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेतील कलमांसह मोटार वाहन अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईदरम्यान एमएच १४ एझेड ७२६९ आणि एमएच ०४ जीआर १७५६ ही दोन वाहने पोलिसांनी जप्त केली आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक कुलदीप संकपाळ, पोलीस उपनिरीक्षक देविदास साळवे, संजय मोहिते व पोलिस अंमलदारांनी केली. पुढील तपास पोलीस हवालदार सय्यद करीत आहेत.
‘DJ, चिथावणीखोर गाणी आणि नियमभंग खपवून घेतला जाणार नाही!’
दहीहंडी, गणेशोत्सव तसेच आगामी सण-उत्सवांच्या काळात नागरिकांनी पोलिसांच्या सूचना व प्रतिबंधात्मक आदेशांचे काटेकोरपणे पालन करावे. विनापरवाना DJ, चिथावणीखोर गाणी, घोषणाबाजी किंवा सार्वजनिक शांतता भंग करणाऱ्या प्रकारांविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा माळेगाव पोलिसांनी दिला आहे.
🔴 एक ओळीचा दमदार पंच
“उत्सव साजरा करा; पण कायदा हातात घेतलात तर माळेगाव पोलिसांचा ‘ॲक्शन’ ठरलेला!”






