स्थानिक

माळेगाव कारखाना अध्यक्षपदाची निवडणूक तहकूब,प्रांताधिकाऱ्यांची प्रकृती बिघडल्याने निर्णायक बैठक पुढे ढकलली

पुढील तारखेची घोषणा लवकरच

माळेगाव कारखाना अध्यक्षपदाची निवडणूक तहकूब,प्रांताधिकाऱ्यांची प्रकृती बिघडल्याने निर्णायक बैठक पुढे ढकलली

पुढील तारखेची घोषणा लवकरच

बारामती वार्तापत्र

राज्याच्या सहकार क्षेत्रात अग्रगण्य मानल्या जाणाऱ्या माळेगाव सहकारी साखर कारखाना अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी बोलाविण्यात आलेली संचालक मंडळाची महत्त्वाची बैठक आज अचानक तहकूब करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी वैभव नावडकर यांची प्रकृती अचानक बिघडल्याने ही सभा पुढे ढकलण्यात आल्याची अधिकृत माहिती देण्यात आली.

दिवंगत लोकनेते अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर कारखान्याच्या अध्यक्षपदाची जागा रिक्त झाली होती. त्या पार्श्वभूमीवर नवीन अध्यक्षाची निवड करण्यासाठी आज रविवारी बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र प्रांताधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे निवडणूक प्रक्रिया राबविता आली नाही. पुढील तारखेची घोषणा लवकरच करण्यात येणार असल्याचे कार्यकारी संचालक अशोक पाटील यांनी सांगितले.

दरम्यान,माळेगावच्या नवनिर्वाचित संचालिका तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार या प्रथमच संस्था प्रतिनिधी ब वर्ग मतदारसंघातून संचालक झाल्यानंतर आजच्या बैठकीस उपस्थित राहिल्या. त्यांनी संचालक मंडळातील सदस्यांची ओळख करून घेत कारखान्याच्या कामकाजाची माहिती जाणून घेतली.सध्या सुरू असलेल्या गाळप हंगामाचा आढावा घेताना साखर कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांवरही त्यांनी चर्चा केली. कार्यकारी संचालक अशोक पाटील यांनी कारखान्याच्या आर्थिक स्थिती, गाळप क्षमता आणि साखर उत्पादनाबाबत सविस्तर माहिती दिली.

बैठकीस उपाध्यक्षा संगीता कोकरे, ज्येष्ठ संचालक बाबासाहेब तावरे यांच्यासह संचालक मंडळाचे सदस्य उपस्थित होते. तसेच छत्रपती सहकारी साखर कारखाना अध्यक्ष पृथ्वीराज जाचक व सोमेश्वर सहकारी साखर कारखाना अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांचीही उपस्थिती होती. दुसरीकडे, माळेगावच्या अध्यक्षपदाच्या निवडीकडे संपूर्ण सहकार क्षेत्राचे लक्ष लागले आहे. पुढील बैठकीत अध्यक्षपदाची धुरा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे देणार आहे, असे संचालक मंडळाने पत्रकारांशी बोलताना जाहीर केले.

Back to top button