माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; सभासदांचे हित सर्वोच्च प्राधान्य
अजितदादांचा सहकार क्षेत्रातील वारसा पुढे नेणार; सुनेत्रावहिनी पवार यांची ग्वाही

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; सभासदांचे हित सर्वोच्च प्राधान्य
अजितदादांचा सहकार क्षेत्रातील वारसा पुढे नेणार; सुनेत्रावहिनी पवार यांची ग्वाही
बारामती वार्तापत्र
माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ व गव्हाण पूजन महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री तथा कारखान्याच्या चेअरमन सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी सभासदांचे हित, ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य, कामगारांचे योगदान आणि भविष्यातील पाणी व्यवस्थापन यांना प्राधान्य देण्याचा निर्धार व्यक्त केला.
कारखान्यावर अनेक शेतकरी सभासदांचे संसार अवलंबून असल्याचे सांगताना सुनेत्रावहिनी पवार म्हणाल्या, “प्रत्येक निर्णय घेताना शेतकऱ्यांच्या कष्टांची जाणीव ठेवणे आवश्यक आहे. प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतात चांगला ऊस पिकावा आणि प्रत्येक सभासदाच्या घरात सुख-समृद्धी नांदावी, हीच माझी प्रार्थना आहे.”
अजितदादांचे कार्य पुढे नेण्याचा निर्धार
स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या आठवणींना उजाळा देताना त्यांनी कारखान्याच्या उभारणीतील आणि प्रगतीतील त्यांच्या योगदानाचा उल्लेख केला. अजितदादांच्या निधनानंतर १२ मार्च रोजी आपल्याकडे चेअरमनपदाची जबाबदारी आल्याचे सांगत, त्यांनी सभासदांचे हित जपून काम करण्याची भूमिका स्पष्ट केली.
“दादांनी सभासदांचे हित जपून ज्या पद्धतीने काम केले, त्याच पद्धतीने काम करण्याची माझी भूमिका आहे,” असे त्यांनी सांगितले. कारखान्याच्या पुढील वाटचालीतही सभासदांचे हित केंद्रस्थानी राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आर्थिक शिस्त आणि विकासावर भर
कारखान्याची आर्थिक शिस्त राखणे आणि सभासदांचे हित जपणे या दोन्ही बाबींना महत्त्व असल्याचे सुनेत्रावहिनी पवार यांनी अधोरेखित केले. यंदा कारखान्याने सर्वाधिक ऊसदर दिल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच कारखान्याच्या माध्यमातून लवकरच सीबीजी (कॉम्प्रेस्ड बायोगॅस) प्रकल्प सुरू करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले.
कारखान्याची प्रगती होत असताना या प्रगतीचा लाभ कष्टकरी कामगारांनाही मिळावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. कारखान्याच्या यशामध्ये कामगारांचे योगदान महत्त्वाचे असून, त्यांच्या मेहनतीचा योग्य सन्मान व्हायला हवा, असेही त्या म्हणाल्या.
कमी पाण्यात अधिक ऊस उत्पादनासाठी प्रयत्न
यंदा कमी पावसामुळे पाणी व्यवस्थापनाचा प्रश्न महत्त्वाचा ठरत असल्याचे सांगत सुनेत्रावहिनी पवार यांनी आगामी काळात पाण्याचे नियोजन करण्यावर भर दिला. मराठवाड्यातील दौऱ्यात पाण्याची गंभीर समस्या पाहायला मिळाल्याचा उल्लेख करत त्यांनी कमी पाण्यात अधिक ऊस उत्पादन घेण्याच्या पद्धतींसाठी प्रयत्न करण्याची भूमिका मांडली.
दुष्काळी परिस्थितीत ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पाण्याची कमतरता भासू नये, यासाठी योग्य नियोजन आणि उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर महत्त्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले.
सभासद, शेतकरी आणि कामगारांच्या हितासाठी कटिबद्ध
माळेगाव कारखान्याची आर्थिक शिस्त, विकासाचे नियोजन, ऊस उत्पादकांचे आर्थिक स्थैर्य आणि कामगारांचा सन्मान या बाबींचा समतोल राखून कारखान्याची वाटचाल सुरू ठेवण्याचा निर्धार सुनेत्रावहिनी पवार यांनी व्यक्त केला.
“सभासदांचे हित हेच कारखान्याचे हित आहे,” ही भूमिका स्पष्ट करत स्वर्गीय अजितदादांनी दाखवलेल्या मार्गावरून कारखान्याची वाटचाल सुरू ठेवणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ७० व्या गळीत हंगामाच्या प्रारंभानिमित्त कारखान्याच्या आगामी वाटचालीत शेतकरी, सभासद आणि कामगारांच्या हिताला प्राधान्य देण्याचा संदेश यावेळी देण्यात आला.






