मित्र असावा ढाली सारखा: लक्ष्मण जगताप
प्रेम ,विश्वास आणि काळजी यावर मैत्रीचे रोपटे फुलत बहरत जाते.
मित्र असावा ढाली सारखा: लक्ष्मण जगताप
प्रेम ,विश्वास आणि काळजी यावर मैत्रीचे रोपटे फुलत बहरत जाते.
बारामती वार्तापत्र
तुम्ही कोणाच्या संगतीत असता ,कोणाशी मैत्री करता ,कोणाच्या सोबत असता याचा तुमच्या जीवनावर खूप मोठा परिणाम होत असतो.असे म्हटले जाते संगतीने माणूस घडतोही आणि बिघडतोही. त्यामुळे तुम्ही मैत्री कोणाशी करता हे महत्त्वाचे आहे.
विचार आणि स्वभाव जुळले की मैत्री होती.तेथे जाती पाती, धर्म ,पंथ ,गरीब ,श्रीमंत यांना अजिबात थारा नसतो.मैत्री ही वाहणाऱ्या निर्मळ पाण्यासारखी शुद्ध असावी.मैत्रीत एकमेकांच्या भावना आणि मन एकजीव होते.अशी मैत्री निस्वार्थ असते.त्यात स्वार्थ नसतो.
मित्र असे जोडा की तुम्हाला अडचणीच्या काळात हात देतील. तुमच्या सुख दुःखात साथ देतील.तुमची सावली बनून नेहमीच तुमच्या सोबत राहतील.
स्वार्थासाठी किंवा काही तरी हेतू साध्य करण्यासाठी केलेली मैत्री कायमस्वरुपी टिकत नाही.मुळात त्या मैत्रीचा पायाच स्वार्थावर आधारीत असतो. म्हणून मित्र जोडताना त्यांची पारख करा.त्याचा स्वभाव बघा.मित्र चुकला तर त्याला समजून घ्या.चुकीच्या माहितीवर अथवा गैरसमजूतीतून मित्र आणि मैत्रीवर अन्याय करु नका.
प्रेम ,विश्वास आणि काळजी यावर मैत्रीचे रोपटे फुलत बहरत जाते.ते टवटवीत होते.त्याला चांगली फुले फळे येतात. चुकीच्या गैरसमजूतीवर मैत्रीचे झाड कधीच तोडू नये. हल्ली अगदी क्षुल्लक गोष्टीतून मैत्रीला तडा जातो.कोणाच्या तरी ऐकीव माहितीवरुन मित्राविषयी मनात शंका कुशंका निर्माण होतात.आणि चांगले मित्र कायमचे दुरावतात.अशा वेळी मोकळ्या मनाने संवाद साधून एकमेकांना समजून घेतले पाहिजे.मैत्रीत मला काय मिळतेय हा विचार नसावा.मित्रासाठी मला जे जे करता येईल.
ते करण्यात खूप मोठे समाधान असते.कधीकधी रक्ताच्या नात्यापेक्षा मैत्रीचे नाते श्रेष्ठ ठरते.याची इतिहासात अनेक उदाहरणे पाहायला मिळतील.मित्रासाठी आपला जीव अर्पण करणारी माणसे आपल्याकडे होऊन गेली.मैत्रीत काही घ्यायचे नसते तर भरभरुन द्यायचे असते.
मित्र नसेल तर तुमचे जीवन शुष्क वाळवंट बनते.जगण्याला मजा येत नाही.माणसाच्या हृदयात अनेक नात्यांसाठी कप्पे असतात.त्यात मैत्रीच्या कप्प्याला आपल्या जीवनात एक वेगळेच स्थान असते.तो कप्पा आपल्याला केव्हाही उलगडता येतो.आणि त्यात मैत्रीचे सुखद क्षण साठवता येतात.
जोडलेले मित्र ही आपली आयुष्याची संपत्ती असते.आई वडील ,बहीण ,भाऊ तसेच नातेवाईक हे आपल्यावर प्रेम माया करतात. जीवनात कधीकधी अशीही वेळ येते की आपल्याला योग्य रस्ता सापडत नाही.त्यावेळी योग्य वाट दाखविणारा मित्रच असतो. माणसावर ज्यावेळी दुःखाचा डोंगर कोसळतो त्यावेळी अश्रू ढाळण्यासाठी आधाराचा खांदा असतो तो मित्राचाच. म्हणून तुम्हाला दुसरे काही नसले तरी चालेल पण जीवापाड प्रेम करणारा मित्र असायलाच हवा.
मित्र असावा कवी कलश सारखा जो शंभू राजांची दिवसरात्र सावली बनून राहतो.खूप मित्र असण्यापेक्षा मोजकेच पण जिवलग मित्र तुमचे आयुष्य आनंदी करतात.