मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महसूल मंत्र्यांच्या हस्ते बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाचे भूमिपूजन
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी संबंधातील बंधने लक्षात घेऊन मोजक्या उपस्थितांसह
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महसूल मंत्र्यांच्या हस्ते बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाचे भूमिपूजन
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी संबंधातील बंधने लक्षात घेऊन मोजक्या उपस्थितांसह
मुंबई,बारामती वार्तापत्र रिपोर्ट
दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानाजवळील महापौर निवास येथे विकसित करण्यात येत असलेल्या बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाचे भूमिपूजन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी उद्योग मंत्री तथा स्मारकाचे सचिव सुभाष देसाई, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री अनिल परब, महापौर किशोरी पेडणेकर, खासदार संजय राऊत, अरविंद सावंत, राहुल शेवाळे, विनायक राऊत, आमदार सदा सरवणकर, रोहीत पवार, मुख्य सचिव सिताराम कुंटे, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त आर. ए. राजीव, मुंबई महापालिका आयुक्त आय. एस. चहल, मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे आदी मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री. ठाकरे, उपमुख्यमंत्री श्री. पवार, महसूल मंत्री श्री. थोरात यांच्या हस्ते महापौर निवासाच्या प्रांगणात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते कळ दाबून स्मारकाच्या कामाची सुरुवात करण्यात आली. यावेळी प्रांगणामध्ये वृक्षारोपण देखील करण्यात आले. त्यानंतर मुख्यमंत्री आणि अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत स्मारकाच्या कोनशिलेचे अनावरण करण्यात आले.
या ठिकाणी झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात चित्रफितीच्या माध्यमातून स्मारकाविषयी सादरीकरण करण्यात आले. मंत्री श्री. देसाई यांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांसह वास्तुविशारद आभा लांबा, विकासक टाटा कंपनीचे विनायक देशपांडे यांचा सत्कार करण्यात आला.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी संबंधातील बंधने लक्षात घेऊन मोजक्या उपस्थितांसह या भूमिपूजन समारंभाचे नियोजन करण्यात आले होते. त्याचे ऑनलाईन थेट प्रक्षेपण देखील करण्यात आले.
राज्य शासनाने या स्मारक योजनेसाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची प्रकल्प समन्वयीन यंत्रणा म्हणून नियुक्ती केली आहे. स्मारकासाठी भू वापर व पर्यावरणासंबंधीच्या सर्व परवानग्या घेण्यात आल्या असून वास्तू उभारणीचा पहिला टप्पा 14 महिन्यांमध्ये पूर्ण केला जाणार आहे. या ठिकाणी वस्तुसंग्रहालय, कलादालने, संशोधन केंद्र, संग्राहागार, वाचनालय, चर्चासत्रांसाठी सभागृह असणार असून बाळासाहेबांच्या स्मृतींना उजाळा देणाऱ्या संग्रहालयाला आणि स्मारकाला अद्ययावत तंत्रज्ञानाची जोड देण्यात येणार आहे. त्याअंतर्गत महापौर निवास परिसराचे आणि आतील दालनांचे सुशोभीकरण करण्यात येणार असून छोटेखानी इमारती आणि भूमीगत रचना बांधण्यात येणार आहे.