मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान कार्यशाळा लोणी पाटी येथे संपन्न
कामाच्या गुणवत्तेनुसार ग्रामपंचायतींना पारितोषिके जिंकण्याची संधी-गटविकास अधिकारी किशोर माने

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान कार्यशाळा लोणी पाटी येथे संपन्न
कामाच्या गुणवत्तेनुसार ग्रामपंचायतींना पारितोषिके जिंकण्याची संधी-गटविकास अधिकारी किशोर माने
बारामती वार्तापत्र
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाअंतर्गत कामाच्या गुणवत्तेनुसार प्रथम, द्वितीय आणि तृत्तीय क्रमांकाचे अनुक्रमे ग्रामपंचायतींना पाच कोटी, तीन कोटी आणि दोन कोटी रुपयांची पारितोषके जिंकण्याची संधी असून या अभियानाच्या मार्गदर्शक सुचंनाप्रमाणे ग्रामंपचायंतीने एकजुटीने काम करावे, असे आवाहन गटविकास अधिकारी किशोर माने केले.
लोणी पाटी येथील गंगोत्री कार्यालय येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाअंतर्गत जिल्हा परिषदेच्यावतीने पंचायत समितीमार्फत आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी सहाय्यक गटविकास अधिकारी नंदन जरांडे, परिविक्षाधीन सहायक गटविकास अधिकारी प्रदीप गादेकर, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. मनोज खोमणे, गटशिक्षणाधिकारी निलेश गवळी , पशुधन विकास अधिकारी धनंजय पोळ, सहायक कृषी अधिकारी सुनील गायकवाड, विस्तार अधिकारी सुनील जगताप, यशदाचे प्रशिक्षक जालिंदर काकडे, राजेंद्र चांदगुडे, एकूण ९९ ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामपंचायत अधिकारी, ग्रामपंचायत कर्मचारी, ग्राम रोजगार सेवक, ग्रामपंचायत संगणक परिचालक, आपले सरकार केंद्र चालक आदी उपस्थित होते
श्री. माने यांनी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान कालावधीमध्ये करावयाच्या कामांची माहिती दिली. यामध्ये लोकाभिमुख प्रशासन, नागरी सेवा सुविधा केंद्राचा दर्जा, तक्रार निवारण, ग्रामपंचायत संकेतस्थळ, सीसीटीव्ही, लेखापरीक्षण करणे, ग्रामपंचायत सभा व कार्य वृत्तांत नोंदवही, दप्तर अद्यावतीकरण, ग्राम विकास समिती कामकाज, आयुष्यमान भारत कार्ड वितरण, दिव्यांग ओळखपत्र, कर व पाणीपट्टी वसुली, लोक वर्गणीतून उत्पन्न, पाण्याचा ताळेबंद, शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा, विद्युत देयके, रेन वॉटर हार्वेस्टिंग, सूक्ष्म सिंचनाखालील क्षेत्र वाढ करणे, अपारंपारिक ऊर्जा व सौर ऊर्जा वापर, वृक्ष लागवड, प्लास्टिक बंदी आदी बाबत सविस्तर माहितीपर मार्गदर्शन केले.
प्रशिक्षक श्री. काकडे यांनी प्रात्यक्षिकाद्वारे अभियानाची माहिती दिली. शासनाच्या निर्णयानुसार देण्यात आलेल्या गुणांकन व मूल्यांकन तक्त्यानुसार मार्गदर्शन केले. ग्रामपंचायत स्तरावर १ हजार ८७८ पुरस्कार, पंचायत समिती स्तरावर २१ पुरस्कार आणि जिल्हा परिषद स्तरावर तीन पुरस्कार असे एकूण १ हजार ९०२ पुरस्कार देण्यात येणार आहे, अशी श्री. काकडे माहिती दिली.
यावेळी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाबाबत मार्गदर्शक पुस्तिका उपस्थित सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत अधिकारी आणि कर्मचारी यांना वाटप करण्यात आल्या.