मुलांना शाळेत पाठवण्यास ७१ टक्के पालकांचा नकार: सर्व्हे
पालक मुलांना करोना काळात शाळेत पाठवण्यास राजी नाहीत..
मुलांना शाळेत पाठवण्यास ७१ टक्के पालकांचा नकार: सर्व्हे
कोविड-१९ विषाणूच्या संसर्गामुळे देशभर मार्च महिन्यापासून शाळा बंद आहेत. शिक्षण ऑनलाइन पद्धतीने सुरू आहे. केंद्र सरकारने मागील काही महिन्यांपासून हळूहळू अनलॉकची प्रक्रिया सुरू केली आहे. याअंतर्गत २१ सप्टेंबरपासून नववी ते बारावीचे वर्ग प्रत्यक्ष सुरू करण्यासाठी केंद्र शासनाने सशर्त परवानगी दिली आहे. असे असले तरी पालक मात्र मुलांना करोना काळात शाळेत पाठवण्यास राजी नाहीत.
लोकलसर्कल्स या कम्युनिटी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने केलेल्या एका ताज्या सर्वेक्षणातून ही माहिती पुढे आली आहे. या सर्वेक्षणानुसार, देशभरातील ७१ टक्के पालक आपल्या मुलांना शाळेत पाठवण्यास इच्छुक नाहीत. जे पालक आपल्या पाल्यांना शाळेत पाठवण्यास तयार आहेत, त्यांच्या संख्येतही ऑगस्ट २०२० च्या तुलनेत २३ टक्के घट झाली आहे. करोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे, शिवाय आता पुढे ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये सणवार आहेत, यासर्व पार्श्वभूमीवर ३२ टक्के पालक म्हणतात की शाळा डिसेंबर अखेरीस सुरू व्हायला हव्यात, तर ३४ टक्के पालकांच्या मते, सरकारने या संपूर्ण वर्षात शाळा सुरू करायला नकोत. केवळ ७ टक्के पालकांना असे वाटते की शाळा १ ऑक्टोबर पासून सुरू व्हायला हव्यात.
केवळ २८ टक्के पालकांना शाळा ३१ डिसेंबर पूर्वी पुन्हा सुरू व्हाव्यात असे वाटते. ३४ ट्क्के पालकांना असे वाटते की शाळा आता थेट पुढील शैक्षणिक वर्षात म्हणजे एप्रिल २०२१ नंतर सुरू व्हायला हव्यात असे वाटते.