मोठी घोषणा, अखेर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टींचा महाविकास आघाडीला रामराम!
सध्या भाजप सोबत जाण्याचा विचार स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केलेला नाही असंही ते म्हणाले.

मोठी घोषणा, अखेर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टींचा महाविकास आघाडीला रामराम!
सध्या भाजप सोबत जाण्याचा विचार स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केलेला नाही असंही ते म्हणाले.
कोल्हापूर,प्रतिनिधी
महाविकासआघाडीला मोठा धक्का बसला आहे. अखेर स्वाभिमानी शेतकरी संघटना महाविकास आघाडीमधून बाहेर पडली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी आज याची घोषणा केली. कोल्हापूर जिल्ह्यातील चोकाक इथल्या राज्य कार्यकारणी बैठकीत राजू शेट्टींनी ही घोषणा केली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना यापुढे कोणत्याही पक्षासोबत जाणार नसल्याचे ही त्यांनी स्पष्ट केले आहे.
राजू शेट्टी गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडी सरकारवर नाराज असल्याची चर्चा होती. राजू शेट्टी यांनी काही महिन्यांपूर्वी महापूरग्रस्तांना मदत मिळावी यासाठी पंचगंगा परिक्रमा यात्रा काढली होती. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना मदत करण्याचं आश्वासन दिलं होतं. पण ते आश्वासन पाळलं गेलं नसल्याचा आरोप राजू शेट्टी यांचा आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावा यासाठी राजू शेट्टी संघर्ष करत आहेत.
पुन्हा एकदा शेतकऱ्याच्या बांधावर जाऊ. त्याला ही सगळी परिस्थिती सांगू. दिल्लीवाल्यांनी फसवलं, मुंबईवाल्यांनी फसवलं. आम्हाला आता आमच्या मनगटावर न्याय मिळवून द्यायचाय. आता या सरकारच्या धोरणाच्या विरोधामध्ये निराश होऊन तडफडून मरण्यापेक्षा लढता लढता मरण्याचा निर्णय घेऊयात, असे आवाहन यावेळी राजू शेट्टी यांनी केले आहे. आता राजू शेट्टी यांनी एकला चलो रे ही भूमिका घेतली आहे.
राजू शेट्टी काय म्हणाले?
आता रोज ईडीच्या चौकशी बद्दल ऐकतोय, माझं ईडीच्या प्रमुखांना सांगणं आहे. विमा कंपन्या शेतकऱ्यांना हजारो कोटींचा चुना लावत आहेत. त्याचे पुरावे आणि तक्रारी मी केली आहे. मग याचा तपास का होत नाही? असा सवालही त्यांनी केला आहे. त्यांना 22 हजार कोटींची नफा कसा झाला? याचा तपास cbi का करत नाही. त्यामुळे देशभरात शेतकऱ्यांचा नवा एल्गार पाहायला मिळेल. आम्ही कधी एनडीएच्या मागे लागलो नाही आणि महाविकास आघाडीच्याही मागे लागलो नाही. एनडीएसोबत यावं यासाठी गोपीनाथ मुंडे यांनी विनंती केली आणि महाविकास आघाडी सोबत यावं म्हणून शरद पवारांनी विनंती केली, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.