“मोठ्यांना मोकळे रान आणि छोट्यांवरच दंडात्मक कारवाई”बारामती आरटीओचा गजब कारभार
“मोठ्यांना मोकळे रान आणि छोट्यांवरच दंडात्मक कारवाई”

“मोठ्यांना मोकळे रान आणि छोट्यांवरच दंडात्मक कारवाई”बारामती आरटीओचा गजब कारभार
“मोठ्यांना मोकळे रान आणि छोट्यांवरच दंडात्मक कारवाई”
बारामती वार्तापत्र
बारामतीत आरटीओच्या कारभारावरून सध्या तीव्र चर्चा सुरू असून गोरगरिबांवर अन्याय होत असल्याचा आरोप पुढे येत आहे. विशेषतः दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर आरटीओची कारवाई एकतर्फी आणि मनमानी पद्धतीने सुरू असल्याचे चित्र असल्याची चर्चा शहरात रंगली आहे.
गेल्या काही दिवसांपासून काही पुढारी व संबंधित अधिकाऱ्यांकडून बारामतीत ॲम्बुलन्स सुविधा दिली जात असल्याचे समोर आले होते. मात्र,स्थानिक वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार संबंधित ॲम्बुलन्स वाहनांकडे टॅक्स, परमिट, इन्शुरन्स यांसारखी आवश्यक कागदपत्रे नसल्याचे नमूद करण्यात आले आहे. तरीसुद्धा या प्रकरणात कोणतीही ठोस कारवाई झालेली दिसत नसल्याने नागरिकांमध्ये प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
याउलट, हातावर पोट असलेल्या छोट्या व्यावसायिकांवर मात्र कठोर कारवाई होत असल्याचे उदाहरण नुकतेच समोर आले. बारामती एमआयडीसी परिसरात आईस्क्रीम गाडीवर आरटीओकडून कारवाई करण्यात आली एका गाडीला वीस हजार तर अजून एका गाडीला साडे चार हजार रुपये दंड केला आहे.असा हजारो रुपयांचा दंड वसूल करण्यात आल्याची माहिती आहे.या घटनेनंतर लहान व्यावसायिकांमध्ये संतापाची भावना व्यक्त होत आहे.
ज्या गाडीवर कारवाई झाली ते आईस्क्रीम्स ती गाडी आरटीओ ऑफिसमध्ये नेहली असल्यामुळे ते आईस्क्रीम खराब होऊ नये म्हणून त्या व्यक्तीने तात्काळ इतरांकडून पैशाची मदत घेऊन दंड भरला आहे.
“मोठ्यांना मोकळे रान आणि छोट्यांवरच दंडात्मक कारवाई” असा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.जर नियमभंग होत असेल तर तो सर्वांसाठी समान असावा, अशी मागणी होत आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यकाळात अशा प्रकारची एकतर्फी कारवाई झाली नसती, असे काही व्यावसायिकांचे मत आहे. “न्याय मागण्यासाठी आमच्याकडे आधार होता; आता तोही हरपला,” अशी भावना काही आईस्क्रीम विक्रेत्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, आरटीओ प्रशासनाकडून या प्रकरणाबाबत अधिकृत भूमिका अद्याप स्पष्ट करण्यात आलेली नाही. मात्र, शहरात या विषयावर तीव्र चर्चा सुरू असून, कारवाईत पारदर्शकता आणि समानता राखावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.







