युगेंद्र पवार यांच्या उपस्थितीत बारामतीत उमेदवारांच्या मुलाखतींना सुरुवात
‘राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी’ लढतीची चर्चा

युगेंद्र पवार यांच्या उपस्थितीत बारामतीत उमेदवारांच्या मुलाखतींना सुरुवात
‘राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी’ लढतीची चर्चा
बारामती वार्तापत्र
बारामती परिसरात आगामी नगरपालिका निवडणुकांचे बिगुल वाजल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला आहे. शरद पवार गटाचे नेते युगेंद्र पवार यांनी स्थानिक स्तरावर इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यास सुरुवात केली आहे. या मुलाखती शरदचंद्र पवार पक्षाच्या बारामती येथील पक्ष कार्यालयात पार पडत आहेत.
माळेगाव नगरपंचायतीपासून सुरुवात
सर्वप्रथम माळेगाव नगरपंचायतीसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. या प्रक्रियेद्वारे आगामी निवडणुकीत कोणत्या वार्डातून कोण उमेदवार मैदानात उतरतील याचा निर्णय घेण्याची तयारी सुरू आहे. मुलाखतींमध्ये स्थानिक कार्यकर्त्यांचा चांगलाच उत्साह दिसून आला.
त्यानंतर बारामती नगर परिषदेच्या मुलाखती
माळेगावनंतर बारामती नगर परिषदेच्या उमेदवारांच्या मुलाखती देखील युगेंद्र पवार यांच्या उपस्थितीत घेतल्या आहेत.स्थानिक पातळीवर कोणते चेहरे पुढे येणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.
‘राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी’ लढतीची चर्चा
बारामतीतील राजकीय समीकरणे नेहमीच चर्चेचा विषय असतात. यावेळीही शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्यात थेट लढत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मागील काही महिन्यांपासून दोन्ही गट आपापल्या पातळीवर संघटनबांधणी आणि कार्यकर्त्यांची मोर्चेबांधणी करण्यात व्यस्त आहेत.
अजित पवार गटाच्याही मुलाखती गुरुवारी
दुसऱ्या बाजूला,अजित पवार गटाचे उमेदवार यांच्याही मुलाखती येत्या गुरुवारी घेण्यात येणार असल्याचे समजते. त्यामुळे बारामतीत पुढील काही दिवसांत राजकीय चुरस शिगेला पोहोचणार आहे.






