
रयत सेवक कालिदास अंदुरे यांचे निधन
अचानक निधनाने विद्यार्थी व शिक्षकांमध्ये हळहळ व्यक्त
इंदापूर : प्रतिनिधी
रयत शिक्षण संस्थेच्या सौ कस्तुराबाई श्रीपती कदम विद्यालय व ज्युनियर कॉलेज मध्ये इंग्रजी विषयाचे शिक्षक म्हणून कार्यरत असणारे कालिदास अंदुरे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्यावर बारामती व नंतर पुणे येथे उपचार सुरू होते. परंतु शुक्रवार दि. 19 मार्च रोजी रात्री 12:15 वाजता उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे.
विद्यार्थीप्रिय शिक्षक तसेच शाळेसाठी वेळ देणारे, पडेल ते काम करणारे असे मनमिळावू शिक्षक सोडून गेल्याने सर्वांनाच अतीव दुःख झाले. अंदुरे हे अतिशय गरीब कुटुंबातून शिक्षण घेऊन रयत शिक्षण संस्थेत नोकरीस लागले. कोलवडी या शाखेत नोकरीची सुरुवात केली.2006 पासून ते इंदापूर शाखेत कार्यरत होते. शाळेच्या व संस्थेच्या विविध उपक्रमांमध्ये ते स्वतःहून सहभागी होत असत. आलेल्या प्रत्येक चांगल्या वाईट प्रसंगाला नेहमी हसत हसत सामोरे जात असत.
त्यांचे मूळ गाव सोनेगाव असून सध्या ते इंदापूर मध्येच स्थायिक झाले होते. त्यांच्या निधनाबद्दल शाळा समिती सदस्य प्रदीप गारटकर, डॉ श्रेणिक शहा, डॉ.लहू कदम, विद्यालयाचे प्राचार्य रामचंद्र पाटील, माजी नगराध्यक्ष विठ्ठल ननवरे, गटनेते कैलास कदम, माजी नगरसेवक श्रीधर बाब्रस, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दादासाहेब चव्हाण, पर्यवेक्षक रघुनाथ वाहुळ, सर्व सेवक व कर्मचारी वृंद, पालक, माजी विद्यार्थी व विद्यालयात शिकत असणारे विद्यार्थी यांनी दुःख व्यक्त केले.