रस्ते होणार सुसाट ! नितीन गडकरींकडून बारामती -इंदापूर – तोंडले पालखी मार्गासाठी ३०७२ कोटींचा निधी
हर्षवर्धन पाटील यांनी मानले आभार
रस्ते होणार सुसाट ! नितीन गडकरींकडून बारामती -इंदापूर – तोंडले पालखी मार्गासाठी ३०७२ कोटींचा निधी
हर्षवर्धन पाटील यांनी मानले आभार
इंदापूर: प्रतिनिधी
संत तुकाराम महाराज पालखी (एनएच ९६५) मार्गावरील बारामती – इंदापूर – तोंडले या चार पदरी रस्त्याच्या कामासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितिन गडकरी यांनी ३०७२ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. या पालखी मार्गामुळे परिसराच्या विकासाला मोठी चालना मिळणार असल्याची माहिती भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिली. दरम्यान, पालखी मार्गासाठी भरीव निधीची तरतूद केल्याबद्दल केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांचे हर्षवर्धन पाटील यांनी आभार व्यक्त केले.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितिन गडकरी महाराष्ट्रामध्ये रस्त्यांचे मोठे जाळे निर्माण करीत आहेत. महाराष्ट्र ही संतांची भूमी असल्याने व संत परंपरेचे राज्यातील योगदान व महत्व लक्षात घेऊन नितीन गडकरी यांनी संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम महाराज पालखी मार्ग निर्मितीसाठी भरीव निधी उपलब्ध केला आहे. तुकाराम महाराज पालखी मार्गावरील बारामती ते इंदापूर टप्प्याकरिता रू.१४७१ कोटी व इंदापूर ते तोंडले – बोडले टप्प्याकरिता रू.१६०१ कोटी या प्रमाणे एकूण रू. ३०७२ कोटींची भरीव तरतूद केली आहे, असे हर्षवर्धन पाटील यांनी स्पष्ट केले.
सध्या तुकाराम महाराज पालखी मार्गासाठी जमिनीच्या अधिग्रहनाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. येत्या अडीच ते तीन वर्षात या पालखी मार्गाचे काम पूर्ण करण्याचा महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचा मानस आहे. या पालखी मार्गामुळे बारामती, इंदापूर, माळशिरस तालुक्याचा चेहरा मोहरा बदलणार आहे,असे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.
गडकरींकडून इंदापूरातील इतर रस्त्यांसाठीही निधी- हर्षवर्धन पाटील
केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचे इंदापूर तालुक्यातील रस्त्यांच्या विकासासाठी विशेष लक्ष आहे. यापूर्वी त्यांनी डाळज ते वालचंदनगर -कळंब रस्त्यासाठी निधी दिला . तसेच सध्या भिगवन ते कर्जत मार्गासाठीही नितीन गडकरी यांनी मोठा निधी उपलब्ध करून दिला आहे, असेही हर्षवर्धन पाटील यांनी नमूद केले.