राजकीय नेत्याचा खंदा समर्थक असल्याचे सांगत बारामतीतील; ‘बंटी-बबली’ने घातला १० कोटी रुपयांचा गंडा
मुंबईच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी सुरु

राजकीय नेत्याचा खंदा समर्थक असल्याचे सांगत बारामतीतील; ‘बंटी-बबली’ने घातला १० कोटी रुपयांचा गंडा
मुंबईच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी सुरु..
बारामती वार्तापत्र
एका पती-पत्नीने पुण्या मुंबईतील उद्योजकांना दुग्ध व्यवसायात गुंतवणुकीचे आमिष दाखवित तब्बल १० कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
कोट्यवधीच्या आर्थिक फसवणुकीप्रकरणी आनंद सतीश लोखंडे (वय २८), विद्या सतीश लोखंडे (वय २४, दोघेही रा.जळोची, ता.बारामती) यांच्याविरोधात १० कोटी २१ लाख ५९ हजार ३६७ रुपयांच्या फसवणूकप्रकरणी बारामती डेअरी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने तक्रार दाखल केली आहे.
याप्रकरणी विद्यानंद डेअरी प्रायव्हेट लिमिटेडच्या व्यवस्थापकीय संचालक प्रीती निंबाळकर आणि इतर सहकाऱ्यांचीही मुंबईच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी करण्यात येत आहे. दरम्यान, या लोखंडे दाम्पत्याने पुणे, मुंबईतील अनेकांना विविध आमिष दाखवत कोट्यवधी रुपयांना गंडा घातल्याचे समोर आले आहे. हा लोखंडे तालुक्यातील राजकीय नेत्याचा खंदा समर्थक असल्याचे सांगत असून, युवा उद्योजक म्हणून मिरवत आहे.
बारामतीच्या लोखंडे दाम्पत्याने केलेल्या फसवणूकप्रकरणी अधिक माहितीसाठी चौकशी अधिकारी पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना संपर्क साधून तक्रार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. बारामती तालुक्यात विविध क्षेत्रांत कंपन्या स्थापन करून आपण मोठे व्यावसायिक असल्याचे सांगत या दाम्पत्याने अनेकांची मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक केली आहे. त्याने आपण एका नेत्याच्या जवळचे असून, निवडणुकीत त्यांचे आर्थिक व्यवहार आपणच पाहत असल्याच्या अनेकांना बतावण्या केल्या. त्यातून अनेकांना कोट्यवधी रुपयांना गंडा घातल्याचे समोर येत आहे. यात लखोबाने एका दूध व्यवसायातील कंपनीला तब्बल १० कोटी रुपयांना गंडा घातल्याचे उघड झाले आहे.
मंत्रालयातील अधिकाऱ्यांचीही केली फसवणूक
पती-पत्नीने मंत्रालयातील अनेक मोठ्या अधिकाऱ्यांनादेखील गुंतवणुकीचे आमिष दाखवले. त्यामध्ये अनेक अधिकाऱ्यांनी गुंतवणूक केल्याचे समोर आले आहे. त्यांनीही मुंबईच्या आर्थिक गुन्हे शाखेत तक्रार दिली असून, तपास सुरू आहे. त्यामुळे आनंद लोखंडे आणि इतर संचालकांच्या लवकरच मुसक्या आवळल्या जाणार असल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.
‘ते’ धनादेश वटलेच नाहीत
व्यवसायाशी संबंधित कंपनीच्या नावावर मुंबईतील एका कंपनीकडून एका आठवड्यात रक्कम देण्याचे आश्वासन देऊन २ कोटी रुपयांचे लोणी खरेदी केले. तसेच या कंपनीकडून दूध पुरवठ्यासाठी तब्बल ९३ लाख रुपये घेतले. तसेच या कंपनीकडून दूध व्यावसायिकांना अतिरिक्त फायदा देण्यासाठी म्हणून ६ कोटी ४३ लाख रुपयांची बनावट बिले सादर केल्याचे उघड झाले आहे. मात्र, ही रक्कम कंपनीला मिळालीच नाही. याचप्रकारे इतर व्यवहार करीत धनादेश (चेक) दिले. परंतु प्रत्यक्षात ते वटलेच नसल्याने कोट्यवधींची फसवणूक झाल्याचे निष्पन्न झाले आहे.