राजमाता जिजाऊंनी आपल्या जीवनात कर्तव्याला प्राधान्य दिले – हर्षवर्धन पाटील
इंदापूर महाविद्यालयात राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी
राजमाता जिजाऊंनी आपल्या जीवनात कर्तव्याला प्राधान्य दिले – हर्षवर्धन पाटील
इंदापूर महाविद्यालयात राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी
इंदापूर : प्रतिनिधी
आय कॉलेज आणि शिवभक्त परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने इंदापूर महाविद्यालयातील शाहीर अमर शेख सभागृहामध्ये राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली.यावेळी बोलताना राज्याचे माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी राजमाता जिजाऊंनी नातं, भावना आणि कुटुंब यापेक्षा आपल्या जीवनामध्ये कर्तव्याला सातत्याने प्राधान्य दिल्याचे सांगितले. तसेच स्वामी विवेकानंदांनी युवकांसमोर आदर्श निर्माण केला असल्याचे सांगितले.
इंदापूर महाविद्यालयात दरवर्षी मोठ्या उत्साहात जिजाऊ जयंती आणि स्वामी विवेकानंद जयंती साजरी होत असते मात्र कोरोना पार्श्वभूमीवर यावर्षी अत्यंत साधेपणाने सोशल डिस्टन्स तसेच कोरोना प्रतिबंधक उपायांचा अवलंब करीत जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले.मान्यवरांच्या हस्ते मेजर महादेव सोमवंशी, मेजर गवळी, मेजर रविराज पवार, मेजर बाजीराव शिंदे यांचा यावेळी सन्मान करण्यात आला.
हर्षवर्धन पाटील म्हणाले की,’ राजमाता जिजाऊ यांची आपण आज ४२४ वी जयंती साजरी करत असून हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवरायांना राजमाता जिजाऊने घडवले. त्यांनी आपल्या जीवनामध्ये नातं, भावना आणि कुटुंब यापेक्षा कर्तुत्वाला सातत्याने प्राधान्य दिले. चारशे वर्षांपूर्वी हिंदू संस्कृती मधील जिजाऊमध्ये हे पुरोगामी विचार यावरून जिजाऊंची वैचारिक प्रगल्भता किती मोठी होती हे लक्षात येते. राजमाता जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांना राजनीती, गनिमी, क्रीडा, लढण्याचे, संस्काराचे तसेच न्याय भूमिकेचे शिक्षण दिल्याचे यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले. आज आपण युवा दिन साजरा करीत असून शिकागो परिषदेमध्ये स्वामी विवेकानंद यांनी सगळे विश्व हे माझे बंधू आहे असे मत व्यक्त करत राष्ट्राच्या आणि जगाच्या युवाशक्तीवर लक्ष केंद्रित केले होते. सध्या कोरोनाची तिसरी लाट येऊ पाहत आहे. लक्षणे वाटली तर ते अंगावर काढू नका. सर्दी, ताप, खोकला, अंगदुखी, यासारखी लक्षणे असतील तर टेस्ट करा तसेच कोरोना टेस्ट पॉझिटीव्ह आल्यानंतर देखील न घाबरता योग्य उपचार केल्यानंतर आपण बरे होऊ शकतात हा कोविड झाल्यानंतरचा स्वतःचा अनुभव त्यांनी यावेळी सांगितला.
शिवभक्त परिवाराचे प्रमुख समाजभूषण डॉ. लक्ष्मण आसबे यांनी राजमाता जिजाऊ तसेच छत्रपती शिवाजी महाराज आणि महापुरुषांच्या कार्याची माहिती सांगून त्यांनी आपल्या भाषणामध्ये राजमाता जिजाऊंनी शिवरायांच्या प्रत्येक पराक्रमाचा पैलु घडविला असल्याचे सांगितले.
यावेळी स्वामी समर्थ उद्योग समूहाचे बाळासाहेब पाटील, माजी नगरसेवक शेखर पाटील, माजी नगरसेवक पांडुरंग शिंदे, शिवसेना शहर प्रमुख मेजर महादेव सोमवंशी, सामाजिक कार्यकर्ते पोपट पवार, सुभाष काळे हे मान्यवर यावेळी उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय चाकणे यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.रोहिदास भांगे यांनी केले तर आभार बापू जामदार यांनी मानले.