राजमाता जिजाऊ यांनी अनेक आघात होऊनही राष्ट्रभक्तीचे संस्कार घडविले- हर्षवर्धन पाटील

राजमाता जिजाऊ यांचा आदर्श घेणे गरजेचे

राजमाता जिजाऊ यांनी अनेक आघात होऊनही राष्ट्रभक्तीचे संस्कार घडविले- हर्षवर्धन पाटील

राजमाता जिजाऊ यांचा आदर्श घेणे गरजेचे

इंदापूर प्रतिनिधी –

स्वराज्य प्रेरिका राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद जयंती निमित्त इंदापूर महाविद्यालयात आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये बोलताना राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील म्हणाले की ,’ राजमाता जिजाऊ यांना आपल्या ७२ वर्षाच्या आयुष्यामध्ये खूप संकटाचा सामना करावा लागला परंतु अनेक आघात होऊनही राजमाता जिजाऊ यांनी राष्ट्रभक्तीचे संस्कार घडविले.’ सरदार कान्होजी जेधे यांचे 14 वे वंशज युवराज यशवंत जेधे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कामधेनु परिवाराचे संस्थापक अध्यक्ष समाजभूषण डॉ. लक्ष्मण आसबे यांनी राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवरायांचा गौरवशाली इतिहास सांगितला.

सुरुवातीला सरदार कान्होजी जेधे यांच्या शिवकालीन तलवारीची शोभायात्रा काढण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या पुतळ्यांचे मान्यवरांनी पूजन करून झाली.

अमर शहीद जवान ज्ञानदेव लक्ष्मण पवार रा. पवारवाडी ता. इंदापूर यांच्या वीरपत्नी सौ. सावित्रीबाई ज्ञानदेव पवार यांना मान्यवरांच्या हस्ते जिजाऊ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले तसेच वीरपत्नी सुवर्णाताई डोईफोडे आणि आजी-माजी सैनिकांच्या माता किंवा पत्नी यांचा शिवभक्त परिवाराच्या वतीने साडी व गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला.

सीए परीक्षेत यश मिळवलेली श्री. नारायणदास रामदास हायस्कूल व इंदापूर महाविद्यालयाच्या पदव्युत्तर वाणिज्य ( एम कॉम ) विभागाची विद्यार्थिनी श्रद्धा आण्णासाहेब पाटील तसेच दिल्ली येथील राजपथावर परेडसाठी निवड झालेला इंदापूर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय छात्र सेनेचा विद्यार्थी ऋषिकेश शिंदे आणि वर्ल्ड सायंटिस्ट पुरस्कार मिळवलेले महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. सुरेंद्र शिंदे व शिवप्रताप मर्दानी आखाडा पुरस्कार सन्मानित प्राप्तेश बर्गे यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

शिवप्रताप मर्दानी आखाडा पंधारवडी ता. इंदापूर येथील शिवभक्तांनी तलवारबाजी , दांडपट्टा , लाठीकाटी यासारख्या साहसी मर्दानी शिवकालीन युद्ध कला प्रात्यक्षिकांचे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. श्री. नारायणदास रामदास विद्यालयातील विद्यार्थिनींनी देखील युद्ध कलेचे यावेळी प्रात्यक्षिक सादर केले.शिवभक्त परिवाराच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

हर्षवर्धन पाटील म्हणाले की,’ राजमाता जिजाऊ यांचा आदर्श घेणे गरजेचे आहे. राजमाता जिजाऊ हिंदवी स्वराज्याच्या माँसाहेब होत्या. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक त्यांना पाहता आला. आपल्या गुणवत्ता आणि विद्वत्तेच्या जोरावर ज्यांनी आपले नाव जगामध्ये मोठे केले असे स्वामी विवेकानंद यांचा आदर्श नव्या पिढीने घेतला पाहिजे.’

युवराज यशवंत जेधे यांनी आपल्या घराण्याचा देदीप्यमान इतिहास सांगितला तसेच स्वराज्य कार्याचा प्रेरणा असणारा जेधे घराण्याचा कारी ता. भोर येथील वाडा पाहण्याचे त्यांनी आवाहन केले.

डॉ. लक्ष्मण आसबे यांनी आपल्या व्याख्यानात विद्यार्थ्यांना इतिहासातील अनेक घटना, प्रसंग व त्यातील दाखले देत ऐतिहासिक माहिती दिली तसेच ते म्हणाले की जिजाऊंचे संस्कार आजच्या युवतींनी स्वीकारावे कारण त्यामध्ये चारित्र्य आणि राष्ट्र निर्मितीचे संस्कार आहेत. जन्मापासून संकटाचा सामना करणारे स्वराज्य निष्ठा असणारे सरदार कान्होजी जेधे यांचा छत्रपती शिवाजीराजांनी ‘ सर्जेराव’ किताब देऊन सन्मान केला. अशी कर्तबगार तत्कालीन पिढी घडविण्याचे कार्य राजमाता जिजाऊ यांनी केले.

यावेळी संस्थेचे सचिव ॲड. मनोहर चौधरी ,संचालक तुकाराम जाधव , विलासराव वाघमोडे तसेच पंचायत समितीच्या माजी सभापती ऋतुजा पाटील , महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जीवन सरवदे , उपप्राचार्य प्रा. दत्तात्रय गोळे , विज्ञान विभाग प्रमुख डॉ. शिवाजी वीर , श्री. नारायणदास रामदास हायस्कूलचे मुख्याध्यापक संजय सोरटे ,इंग्रजी माध्यमाच्या मुख्याध्यापिका फौजीया शेख, प्रा. कृष्णा ताटे, मेघश्याम पाटील, बाळासाहेब मोरे , धनंजय पाटील , मायाताई विंचू , राजेंद्र पवार , विकास मोरे , कैलास कदम , सागर गाणबोटे ,गोरख शिंदे ,रघुनाथ राऊत,ललेंद्र शिंदे ,संतोष देवकर हे मान्यवर यावेळी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. नारायणदास रामदास विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सुप्रिया आगरखेड यांनी केले.प्रा. स्वाती राऊत यांनी राज्य व राष्ट्रगीत म्हटले.रघुनाथ पन्हाळकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. शिवभक्त परिवाराचे सदस्य प्रकाश खांबसवाडकर यांनी आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!