राज्यस्तरीय उत्कृष्ट निवेदकांच्या स्पर्धेत इंदापूरच्या माधुरी चव्हाण प्रथम
राज्यभरातील स्पर्धक होते सहभागी

राज्यस्तरीय उत्कृष्ट निवेदकांच्या स्पर्धेत इंदापूरच्या माधुरी चव्हाण प्रथम
राज्यभरातील स्पर्धक होते सहभागी
इंदापूर : प्रतिनिधी
सोलापूर जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम समितीचे सभापती विजयराज डोंगरे यांच्या ४६ व्या वाढदिवसानिमित्त मंगळवारी (दि.२४) राज्यस्तरीय उत्कृष्ट निवेदक स्पर्धा संपन्न झाली.या स्पर्धेत इंदापूरच्या माधुरी चव्हाण यांनी बाजी मारत प्रथम क्रमांक मिळवला.
माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय शेटफळ येथे सदरील स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.स्पर्धेसाठी राज्यभरातून १८ स्पर्धक सहभागी झाले होते. स्पर्धा दोन फे-यात संपन्न झाली. प्रस्तावना व समारोप हे दोन निवेदनातील ठळक मुद्दे होते. दोन मुद्दयांवर स्पर्धेचे विषय हे चिठ्ठीत लिहून ठेवले होते. नाव पुकारल्यानंतर स्पर्धकाने चिठ्ठी काढुन त्या विषयावर चार मिनिटे निवेदन करायचे होते. दोन फेरीतील ही स्पर्धा चुरशीची झाली. दोन्ही फेऱ्यांमध्ये इंदापूरच्या माधुरी चव्हाण यांनी आपल्या हजरजबाबीपणाने प्रथम क्रमांक पटकावला.
निवेदकांची स्पर्धा ही संकल्पना विजयराज डोंगरे यांच्या कल्पनेतून निर्माण झाली होती व ही महाराष्ट्रातील प्रथम निवेदन स्पर्धा असल्याचे विजेत्या माधुरी चव्हाण यांनी सांगितले. या स्पर्धेसाठी परिक्षक म्हणून ह.भ.प. तुकाराम म्हस्के,प्रा.ज्ञानेश्वर जाधव यांनी काम पाहिले. सदर संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. एस.सी.मांढरे व प्रा.सुप्रिया खोसे यांनी केले.