राजकीय

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या मुलाचे परदेशात होणार लग्न!,राष्ट्रवादीच्या केवळ दोन नेत्यांनाच आमंत्रण तर कुटुंबियांची दांडी, कारण काय?

केवळ मोजक्या 400 पाहुण्यांनाच आमंत्रण देण्यात आले आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या मुलाचे परदेशात होणार लग्न!,राष्ट्रवादीच्या केवळ दोन नेत्यांनाच आमंत्रण तर कुटुंबियांची दांडी, कारण काय?

मात्र, शरद पवार, सुप्रिया सुळे आणि श्रीनिवास पवार यांच्यासह कुटुंबातील प्रमुख सदस्य या विवाहसोहळ्याला अनुपस्थित राहणार आहेत.

बारामती वार्तापत्र

राज्यातील राजकीय कुटुंब म्हणून चर्चेत असलेल्या पवार कुटुंबामध्ये सध्या लगीनघाई सुरु झाली आहे.

अजित पवार यांच्या घरी लग्नसराई होणार आहे. अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांचा पुढच्या आठवड्यामध्ये शाही विवाह सोहळा पार पडणार आहे. दोन दिवसांपूर्वी अजित पवारांचे पुतणे युगेंद्र पवार यांचा विवाह झाला. यानंतर आता जय पवार हे बोहल्यावर चढणार आहे. जय पवार यांचा विवाह हा परदेशामध्ये होणार असून केवळ 400 पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा होणार आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांचे ऋतुजा पाटील यांच्याशी लग्न होणार आहे. जय पवार यांचा विवाह येत्या आठवड्यात थाटात पार पडणार आहे. जय पवार यांचा लग्नसोहळा संपूर्णतः परदेशात होणार आहे. बहरीनमध्ये जय पवार यांचा लग्न सोहळा आयोजित करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, पवार कुटुंबाच्या या महत्त्वाच्या सोहळ्याला केवळ मोजक्या 400 पाहुण्यांनाच आमंत्रण देण्यात आले आहे. त्यामध्ये राष्ट्रवादी पक्षातून फक्त दोनच नेत्यांना आमंत्रण देण्यात आले आहे. मोजक्या पाहुण्यांमध्ये होणाऱ्या या लग्नाची सध्या राजकीय वर्तुळामध्ये जोरदार चर्चा आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, अजित पवार यांच्या मुलाच्या लग्नाला राष्ट्रवादी पक्षातून केवळ दोन नेत्यांनाच आमंत्रण देण्यात आले आहे. यामध्ये पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचा समावेश आहे. पक्षातील इतर बडे नेते आणि आमदार-खासदारांना निमंत्रण न देण्याचा निर्णय पवार कुटुंबाने घेतला आहे. लग्नाची ई-पत्रिका आणि कार्यक्रमपत्रिका आता समोर आली असून त्यानुसार बहरीनमध्ये चार दिवसांचा भव्य पण खाजगी सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या जय पवार यांच्या पत्रिकेमध्ये कार्यक्रमांचा तपशील देण्यात आला आहे. जय पवारच्या लग्न पत्रिकेनुसार, ४ डिसेंबर रोजी मेहंदी समारंभ पार पडणार आहे. ५ डिसेंबरला हळद, मेहंदी आणि मुख्य विवाह सोहळा पार पडणार आहे. ६ डिसेंबर रोजी संगीत समारंभ होणार आहे. तर ७ डिसेंबरला स्वागत समारंभ आणि रिसेप्शन पार पडणार आहे. परदेशामध्ये हा खाजगी शाही विवाह सोहळा पार पडणार आहे.

पवार कुटुंब गैरहजर?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अजित पवार यांचे सख्खे लहान भाऊ असलेले श्रीनिवास पवार हे जय पवार यांच्या विवाहसोहळ्यासाठी बहरीनला जाणार नाहीत. श्रीनिवास पवार आणि त्यांची पत्नी बंगळुरु येथील एका विवाह सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. यामुळे ते बहरीन येथील कार्यक्रमात गैरहजर राहतील. त्यांच्यासोबतच शरद पवार, त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार आणि सुप्रिया सुळे हे देखील जय पवार यांच्या लग्नाला उपस्थित नसणार असल्याचीही माहिती समोर आली आहे. यामुळे कौटुंबिक मतभेद असल्याची चर्चा रंगली आहे. श्रीनिवास पवार आणि संपूर्ण पवार कुटुंबाच्या गैरहजेरीमुळे पवार कुटुंबातील मतभेद चव्हाट्यावर आल्याचे बोललं जात आहे.

Back to top button