राज्य सरकारची शेतकरी विरोधी भूमिका – हर्षवर्धन पाटील
वीज तोडणी मोहीम तात्काळ थांबवण्याची केली मागणी
राज्य सरकारची शेतकरी विरोधी भूमिका – हर्षवर्धन पाटील
वीज तोडणी मोहीम तात्काळ थांबवण्याची केली मागणी
इंदापूर: प्रतिनिधी
सध्या शेतीपंपांची वीज तोडणी मोहीम वेगात सुरू आहे. वीजे अभावी शेतातील उभी पिके जळून जात असल्याने, शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान करून महाविकास आघाडी सरकार काय साध्य करीत आहे? असा सवाल करून राज्य सरकारने तात्काळ वीज तोडणी मोहीम थांबवावी, अशी मागणी भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केली. इंदापूर तालुक्याचे लोकप्रतिनिधी हे राज्य शासनामध्ये मंत्री आहेत. मात्र ते शेतकऱ्यांच्या वीज तोडणी मोहिमे संदर्भात गप्प आहेत, एक शब्दही बोलत नाहीत, अशी टीकाही हर्षवर्धन पाटील यांनी केली.
राज्य शासनाचे काम हे शेतकरी वर्गाला सहकार्य करण्याचे असते. मात्र सध्याचे महाविकास आघाडी सरकार हे वीज रोहित्रे बंद करून शेतकरी विरोधी भूमिका घेत आहे. हे शासन सत्तेवर आल्यापासून प्रत्येक ३ ते ४ महिन्याला वीज तोडणी मोहीम राबवून शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचे व त्रास देण्याचे काम करीत आहे. सध्या उन्हाळा चालू झाल्यामुळे पिकांना पाण्याची गरज असताना, राज्य सरकारकडून पाणी असूनही वीज बंद करून शेतकऱ्यांना खिंडीत गाठण्याचा हा प्रकार सुरु आहे, अशी टीका हर्षवर्धन पाटील यांनी केली.
शेतकऱ्यांना महावितरणकडून आलेली बिले अव्वाच्या सव्वा अशी आहेत, सदरची बिले दुरुस्त करणे गरजेचे आहे. दोन वर्षांपासून प्रत्येक वीज तोडणीमध्ये शेतकऱ्याकडून काही रक्कम महावितरणकडून वसूल केली जात असून, थकबाकीचे मूळ दुखणे कायम राहत आहे. सध्या शेती पंपाची वीज खंडित करण्यात येत असल्याने शेती धोक्यात आली आहे. शेतकरी बांधव हे अजूनही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आर्थिकदृष्ट्या अडचणीत असताना, महावितरणने शेतीपंपांची वीज तोडणी मोहिम तीव्र केल्याने शेतकरी वर्गातून संतप्त प्रतिक्रिया येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा देणेसाठी महाविकास आघाडी सरकारने मोहीम थांबवून शेतीपंपाचा वीज पुरवठा तात्काळ पूर्ववत सुरु करावा, अन्यथा भाजपच्या वतीने तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशाराही भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिला.