अपंग बांधवांना मायेची थाप व आधार देण्याची गरज : राज्यमंत्री दत्तात्रय भरणे
इंदापूर येथे राज्यमंत्री भरणेंच्या हस्ते अपंग नोंदणी शिबिराचे उद्घाटन

अपंग बांधवांना मायेची थाप व आधार देण्याची गरज : राज्यमंत्री दत्तात्रय भरणे
इंदापूर येथे राज्यमंत्री भरणेंच्या हस्ते अपंग नोंदणी शिबिराचे उद्घाटन
इंदापूर : प्रतिनिधी
अपंग नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेता यावा याकरिता अपंग प्रमाणपत्र नोंदणी शिबिराचे आयोजन इंदापूर उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी गुरुवारी ( दि.२८ ) करण्यात आले होते.या शिबिराचे उद्घाटन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी इंदापूर तालुक्यातुन आलेल्या अनेक अपंग नागरिकांशी राज्यमंत्री भरणेंनी थेट संवाद साधत त्यांची विचारपूस केली व त्यांना आधार दिला.
प्रसंगी बोलताना राज्यमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की, एखाद्या घरामध्ये अपंग व्यक्ती असला तर त्यांना किती अडचणींना सामोरे जावे लागते हे आपण पाहतो. त्यांची हेळसांड होऊ नये,पुणे मुंबईला जाऊ लागू नये, इंदापुर मध्ये त्यांना प्रमाणपत्र मिळावे याकरिता या शिबिराचे आयोजन केले आहे. पुढे देखील मतिमंद, डोळ्या संदर्भातील आजार तसेच विविध आरोग्याशी निगडित विविध शिबिरांचे टप्प्याटप्प्याने आयोजन करणार आहोत.अपंग बांधवांना मायेची थाप व आधार देण्याची गरज आहे.त्यामुळे जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, आजी-माजी नगरसेवक तसेच पदाधिकाऱ्यांनी आप-आपल्या भागातील अशा व्यक्तींची आरोग्य विभागाकडे नोंदणी करावी जेणेकरून अपंगांना मदत करता येईल.
तसेच पुढे बोलताना भरणे म्हणाले की, हे पुण्याचं काम आहे. काहींना जन्मतः तर काहींना वेगवेगळ्या कारणाने अपंगत्व येत असते. त्यामुळे त्यांना आधार द्या, मदत करा व यांची नोंदणी करा. प्रमाणपत्र काढले नाही तर कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ मिळत नाही. अपंगांसाठी शासनाच्या अनेक योजना आहेत त्यांचा लाभ माझ्या तालुक्यातील एक ना एक अपंग बांधवांना झाला पाहिजे, त्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करा. लोकप्रतिनिधी व राज्याचा मंत्री या नात्याने जे जे करता येईल ती मदत करीन. अपंगासाठी असणारे यशवंत घरकुल व संजय गांधी निराधार योजनेचे अर्ज ताबडतोब भरून घ्या. तुमचे मामा तुमच्या बरोबर आहेतच पण हा ‘मामा’ देखील तुमच्या अपंगाच्या मागे खंबीरपणे उभा आहे. जेवढी शिबिरांसाठी मदत लागेल ती शासकीय स्तरावरून करेन असे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यावेळी म्हणाले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे, शहराध्यक्ष बाळासाहेब ढवळे, कार्याध्यक्ष अतुल झगडे, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष सागर मिसाळ, प्रतापराव पाटील,पंचायत समिती सदस्य सतीश पांढरे,सचिन सपकळ,वरिष्ठ उपाध्यक्ष शिवाजीराव पानसरे, अपंग सेल तालुकाध्यक्ष दत्ता बाबर,युवक कार्याध्यक्ष सचिन खामगळ, सरचिटणीस सुभाष डरंगे-पवार,इंदापूर उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.एकनाथ चंदनशिवे,डॉ.सुहास शेळके,अधिकारी,कर्मचारी वर्ग व अन्य उपस्थित होते.