पुणे

राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणांचे अद्ययावत संकेतस्थळ कार्यान्वित

सहकारी संस्थांचे निवडणूक कामकाज पार पाडण्यासाठी माहिती तंत्रज्ञानाची जोड

राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणांचे अद्ययावत संकेतस्थळ कार्यान्वित

सहकारी संस्थांचे निवडणूक कामकाज पार पाडण्यासाठी माहिती तंत्रज्ञानाची जोड

पुणे, प्रतिनिधी

राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणूकांमध्ये मतदार याद्यांचे अधिक्षण, निर्देशन व नियंत्रण करणे व सर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका चांगल्यारितीने पाडण्यासाठी माहिती तंत्रज्ञानाची मदत घेण्यात आली असून राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य यांचे https://scea.maharashtra.gov.in/ संकेतस्थळ कार्यान्वित झाले आहे. संकेतस्थळाला नागरिकांसह सहकारी संस्थांचा चांगला प्रतिसाद असल्याची माहिती राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य चे आयुक्त डॉ. जगदीश पाटील यांनी दिली.

राज्यातील निवडणूकीस पात्र असलेल्या सर्व प्रकारच्या सहकारी संस्था (२५० सभासद व त्यापेक्षा कमी सभासद असणाऱ्या सहकारी गृहनिर्माण संस्था वगळून), तसेच, निवडणूकीस पात्र असलेल्या सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्या यांच्या निवडणूक कामकाजाचे सनियंत्रण या प्राधिकरणामार्फत करण्यात येते.

कामकाजात यापुढील काळात माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात येणार आहे. त्यादृष्टीने हे संकेतस्थळ कार्यान्वित करण्यात आले आहे. या संकेतस्थळावर सहकारी संस्था आणि कृषि उत्पन्न बाजार समित्या यांच्या सभासद, निवडणूक कामकाजाच्या विविध टप्प्यांची माहिती दर्शकांना सुलभरितीने उपलब्ध करून देण्यात येत आहे.

सहकारी निवडणूक प्राधिकरणाच्या संकेतस्थळावर राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाशी निगडित असलेले सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था, साखर आयुक्त, पणन संचालक, दुग्धव्यवसाय विकास आयुक्त, वस्त्रोद्योग आयुक्त, उद्यम विकास आयुक्त, मत्स्यव्यवसाय आयुक्त, गृहनिर्माण विभाग या संकेतस्थळाची माहिती (लिंक) देण्यात आली आहे.

राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाची संरचना, सहकारी संस्था व कृषि उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणूकांची कार्यपद्धती, त्या संबंधित अद्ययावत कायदे व नियम, सहकारी निवडणूक अधिकाऱ्यांची हस्त-पुस्तिका, राज्यातील जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तसेच तालुका सहकारी निवडणूक अधिकारी यांची संपर्क यादी, प्रत्येक जिल्ह्याच्या नामिकेतील क तसेच ड वर्गातील सहकारी संस्थांकरिता निवडणूक निर्णय अधिकारी यांची यादी, नागरिकांची सनद, माहिती अधिकार कायदा २००५ अंतर्गत स्वयं-प्रकटन, वारंवार विचारले जाऊ शकणारे प्रश्न, महत्वाचे नमूने , सांख्यिकी माहिती इत्यादी माहिती संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामुळे सहकार, कृषी, पणन क्षेत्रामध्ये काम करणारे तज्ज्ञ, अधिकारी आणि कर्मचारी, लोकप्रतिनिधी, सर्वसामान्य नागरिक आणि या क्षेत्रातील अभ्यासकांसाठी ही माहिती उपयुक्त ठरणार आहे.

राज्य शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाचे अपर मुख्य सचिव (सहकार) श्री. अनुप कुमार, महाराष्ट्र इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी कॉर्पोरेशन लिमिटेडच्या कार्यकारी संचालिका सुश्री जयश्री भोज यांच्या मार्गदर्शनाखाली संकेतस्थळ तयार करण्यात आले आहे. येत्या काळात संकेतस्थळावरील सुविधा अधिक विस्तारित करण्याचा मानस असल्याची माहिती राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाच्या सचिवांनी दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

बारामती वार्तापत्र च्या ताज्या बातम्या "WhatsApp", व "Telegram" वर पाहण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा.

Join What's App

Join Telegram