राष्ट्रकुल स्पर्धेचे सुवर्णपदक विजेते महाराष्ट्र केसरी आप्पालाल शेख यांचे निधन

आप्पालाल शेख यांनी १९९३ साली पुण्यातील कुस्ती अधिवेशनात संजय पाटील यांना आस्मान दाखवून महाराष्ट्र केसरीचा किताब पटकावला होता.

 राष्ट्रकुल स्पर्धेचे सुवर्णपदक विजेते महाराष्ट्र केसरी आप्पालाल शेख यांचे निधन

आप्पालाल शेख यांनी १९९३ साली पुण्यातील कुस्ती अधिवेशनात संजय पाटील यांना आस्मान दाखवून महाराष्ट्र केसरीचा किताब पटकावला होता.

सोलापूर – बारामती वार्तापत्र रिपोर्ट

राष्ट्रकुल स्पर्धेचे सुवर्णपदक विजेते महाराष्ट्र केसरी पैलवान आप्पालाल शेख यांचे गुरुवारी सायंकाळी चारच्या सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यू समयी ते 56 वर्षाचे होते. अनेक दिवसांपासून ते मधुमेह आणि मूत्रपिंडाच्या आजाराने ग्रस्त होते. रोज दोन वेळा त्यांना डायलिसीस करावे लागत होते.

मूत्रपिंडाच्या आजारावरील उपचारासाठी जास्त पैसे खर्च झाले होते. गेल्या काही महिन्यांपासून त्यांची आर्थिक परिस्थिती ढासळली होती. त्यांच्या निधनाने कुस्ती जगतात शोककळा पसरली आहे. अनेक पैलवानांना आस्मान दाखवणारे आप्पालाल शेख हे दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी गावातील रहिवासी होते.

apaalal shaikh

आप्पालाल शेख यांचे निधन

कोल्हापूरमध्ये घेतले कुस्तीचे धडे
दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी गावातील रहिवासी असलेले आप्पालाल शेख यांचे बंधू इस्माईल शेख हे देखील पैलवान होते. इस्माईल यांनी कुस्तीच्या सरावासाठी कोल्हापूर गाठलं. त्यांच्या खाण्यापिण्याची सोय व्हावी म्हणून आप्पालाल देखील कोल्हापूरला गेले होते. तिथे त्यांना कुस्तीची आवड निर्माण झाली. 1980 साली आप्पालाल यांचे बंधू इ्स्माईल यांनी महाराष्ट्र केसरी होण्याचा मान मिळवला. भावाचा वारसा पुढे नेत पुढे 1993 साली आप्पालाल देखील महाराष्ट्र केसरी झाले. त्याआधी अनेक छोट्या मोठ्या कुस्त्या आप्पालाल यांनी लढल्या होत्या.

1993 साली बनले महाराष्ट्र केसरी
आप्पालाल शेख यांनी १९९३ साली पुण्यातील कुस्ती अधिवेशनात संजय पाटील यांना आस्मान दाखवून महाराष्ट्र केसरीचा किताब पटकावला होता. महाराष्ट्र केसरी किताब मिळविणारे त्यांच्या घरातील तिघेजण आहेत. यापूर्वी त्यांचे थोरले बंधू इस्माईल शेख हे १९८० साली खोपोली येथे कुस्ती अधिवेशनात महाराष्ट्र केसरी झाले होते. त्यांचे पुतणे मुन्नालाल शेख यांनी जालना येथे २००१-०२ साली महाराष्ट्र केसरीची गदा पटकावली होती. एकाच घरातून तिन्ही मल्ल महाराष्ट्र केसरी होण्याचे मान मिळवणारे बोरामणीचे एकमेव शेख कुटुंबीय आहे.

राष्ट्रकुल स्पर्धेत पटकावले सुवर्णपदक
आप्पालाल शेख यांनी भल्या भल्या मल्लांना लाल मातीत लोळवून लौकिक मिळवत महाराष्ट्र केसरी पर्यंत मजल मारली होती. 1992 साली न्यूझीलंड येथे भरलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत आप्पालाल शेख यांनी भारतातर्फे प्रतिनिधित्व करताना ऑस्ट्रेलिया, इराण, बल्गेरिया व अन्य राष्ट्रांच्या मल्लांना लोळवत अस्मान दाखवले होते. आणि अंतिम सामन्यात न्यूझीलंडच्या मल्लाला आस्मान दाखवत सुवर्णपदकावर स्वतःचे नाव कोरले होते. ‘घिस्सा’ डाव टाकून कुस्ती जिंकणे ही आप्पालाल यांची विशेष कला होती. महाराष्ट्र शासनाने त्यांना शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार देऊन सन्मानित केले होते.

दहा महिन्यांपासून शेख गरिबीशी झुंज होते
जवळपास 10 महिन्यांपूर्वी आप्पालाल शेख यांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या होत्या. समाजातील दानशूर लोकांनी त्यांना मदतीचा हात दिला होता. ज्यांनी कुस्तीसाठी सर्व काही लावलं आज त्यांची तीनही पोरं कुस्तीच्या फडात आपलं नशीब आजमावत आहेत. वडीलांचा ऑलम्पिक पदक मिळवण्याचा अपुरं राहिलेलं स्वप्न पुर्ण करण्याची इच्छा असल्याची प्रतिक्रिया आप्पालाल यांचा मुलगा गौसपाक यांने दिली. गौसपाक सोबत अशपाक आणि अस्लम हे दोघे सोलापुरातच कुस्तीचा सराव करत आहेत. पण मधुमेह आणि मूत्रपिंडाच्या आजाराने ग्रस्त अप्पालाल यांची आर्थिक परिस्थिती खूप ढासळली होती.दोन्ही मुलं कोल्हापूर येथील कुस्तीचे सराव सोडून सोलापुरात आले आहेत. गुरूवारी अप्पालाल यांच्या निधनाने बोरामणी गावावर शोककळा पसरली आहे. लाल मातीतला ढाण्या वाघ हरपला असे वातावरण सोलापुरात निर्माण झाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!