राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना अखेर चार दिवसानंतर ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज
डॉक्टरांनी पवारांना सात दिवस सक्तीने आराम करण्याचा सल्ला दिला आहे.

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना अखेर चार दिवसानंतर ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज
डॉक्टरांनी पवारांना सात दिवस सक्तीने आराम करण्याचा सल्ला दिला आहे.
मुंबई: बारामती वार्तापत्र रिपोर्ट
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना अखेर चार दिवसानंतर ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. पवार हे थोड्याच वेळात सिल्व्हर ओक या त्यांच्या निवासस्थानी पोहोचले आहेत. यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार, कन्या सुप्रिया सुळे आणि जावई सदानंद सुळे उपस्थित होते.
शरद पवार यांना पोटदुखीचा त्रास झाल्यानंतर त्यांना 30 मार्च रोजी ब्रीच कँडीत दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्याच दिवशी त्यांच्यावर शस्त्रक्रिया करून पित्ताशयातून खडा काढण्यात आला. त्यानंतर त्यांना डॉक्टरांच्या निगराणीखाली ठेवण्यात आले होते. त्यांना आराम वाटू लागल्याने आज अखेर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर पत्नी आणि कन्येसह ते सिल्व्हर ओकला पोहोचले आहेत.
बंगल्याभोवतीच्या सुरक्षेत वाढ
डॉक्टरांनी पवारांना सात दिवस सक्तीने आराम करण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे या सात दिवसात पवारांच्या निवासस्थानी कुणालाही प्रवेश दिला जाणार नाही. त्यासाठी बंगल्याभोवतीच्या सुरक्षेत वाढही करण्यात आली आहे. सात दिवस पवार घरीच आराम करणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
पुन्हा शस्त्रक्रिया होणार
15 दिवसानंतर पवारांची पुन्हा एकदा तपासणी केली जाईल. त्यांची प्रकृती उत्तम असेल तर त्यांच्या गॉल ब्लॅडरच्या शस्त्रक्रियेचा निर्णय घेण्यात येणार आहे, असं राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सांगितलं.
नेत्यांकडून विचारपूस
दरम्यान, पवार यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्यानंतर भाजप नेते नारायण राणे, शिवसेना नेते संजय राऊत, कामगार मंत्री हसन मुश्रीफ आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी रुग्णालयात जाऊन पवारांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती.
शरद पवार यांची शस्त्रक्रिया का केली?
शरद पवार यांच्या पित्तनलिकेत एक खडा अडकून बसला होता. हा खडा उघड्यावर राहून देणे योग्य नव्हते. त्यामुळे तातडीने त्यांची शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. दुर्बिणीद्वारे पित्तनलिकेतील खडा काढण्यात आला. त्यामुळे शरद पवार यांच्या यकृतावरील दाब कमी होईल. शरद पवार यांनी थोडी कावीळही झाली होती. तीदेखील कमी होईल, अशी माहिती डॉक्टरांनी दिली. ही शस्त्रक्रिया जवळपास अर्धा तास सुरु होती.