राष्ट्रवादी काँग्रेस व बहुजन मुक्ती पार्टीच्या मेळाव्यांना लोटला हजारोंचा जनसमुदाय
पोलिसांचा डोळेझाक पणा समोर

राष्ट्रवादी काँग्रेस व बहुजन मुक्ती पार्टीच्या मेळाव्यांना लोटला हजारोंचा जनसमुदाय
पोलिसांचा डोळेझाक पणा समोर
इंदापूर : प्रतिनिधी
कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने सर्वच कार्यक्रमांवर निर्बंध घातलेले असताना इंदापूर तालुक्यात मात्र या उलट चित्र पहावयास मिळत आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर इंदापूर तालुक्यातील विविध राजकिय पक्षांकडून मोर्चे बांधणी सुरू असून हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये भव्य मेळावे आयोजित करण्यात येत आहेत.मात्र एकीकडे सर्वसामान्य नागरिकांना मास्क न घातल्याने दंड ठोठावणारे पोलीस प्रशासन या मेळाव्यांकडे डोळेझाक पणा का करत आहे.असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.
राज्यमंत्री दत्तात्रय भरणे व राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शनिवारी ( दि.४ ) इंदापूर शहरातील शहा सांस्कृतिक भवन येथे राष्ट्रवादी काँग्रेसचा तसेच दुसऱ्याच दिवशी म्हणजेच रविवारी ( दि.५ ) बहुजन मुक्ती पार्टी चे राष्ट्रीय महासचिव ॲड. राहुल मखरे व प्रदेशाध्यक्ष श्रीकांत होवाळ यांच्या नेतृत्वाखाली इंदापूर तालुक्यातील मौजे लासुर्णे येथे हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये मेळावा संपन्न झाला.
कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून शासनाकडून निर्बंध घालण्यात आले आहेत. निर्बंधांचे उल्लंघन करणाऱ्यांवर प्रशासनाकडून दंड ठोठावण्यात येतो मात्र एवढ्या मोठ-मोठ्या कार्यकर्ता मेळाव्यांना परवानगी होती का? नसेल तर त्यांवर पोलीस प्रशासन कारवाई करून सर्वांना समान न्याय आहे असे दाखवून देणार का? हे पाहणे औचित्याचे ठरणार आहे.
दरम्यान आगामी नगरपरिषद,जिल्हा परिषद,पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी इंदापूर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस व भारतीय जनता पक्षाने कंबर कसली असताना बहुजन मुक्ती पार्टीला तालुक्यातून प्रचंड मोठ्या प्रमाणावर जनसमर्थन मिळत असल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ॲड.राहुल मखरे यांच्या नेतृत्वाखाली बहुजन मुक्ती पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस व भारतीय जनता पार्टीसाठी मोठी डोकेदुखी ठरेल हे रविवारी लासुर्णे येथे संपन्न झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात जमलेल्या हजारो कार्यकर्त्यांच्या जनसमर्थनावरून दिसून येत आहे.