राष्ट्रसंत भय्युजी महाराज यांचे कार्य दीपस्तंभासारखे : अजमेर शरीफ दर्गाह चे डॉ. पीर सय्यद इरफान मोईन उस्मानी यांचे प्रतिपादन
गरीब मुलींची लग्ने यासाठी भरीव योगदान

राष्ट्रसंत भय्युजी महाराज यांचे कार्य दीपस्तंभासारखे : अजमेर शरीफ दर्गाह चे डॉ. पीर सय्यद इरफान मोईन उस्मानी यांचे प्रतिपादन
गरीब मुलींची लग्ने यासाठी भरीव योगदान
इंदापूर प्रतिनिधी –
परम पूज्य राष्ट्रसंत भय्युजी महाराज यांनी अध्यात्मिक कार्या बरोबरच समता, विश्वबंधुत्व आणि सदाचरण केंद्रबिंदू मानून महत्वपूर्ण योगदान दिले. त्यांचे कार्य दीपस्तंभासारखे आहे. त्यांच्या कार्याचा वारसा संवर्धित करण्या साठी सर्वांनी कालबद्ध योगदान द्यावे असे आवाहन अजमेर शरीफ दर्गाह चे डॉ. पीर सय्यद इरफान मोईन उस्मानी यांनी केले.
इंदापूर येथील श्री दत्त धार्मिक व पारमार्थिक ट्रस्ट आश्रमात भय्युजी महाराज यांच्या भक्त मेळाव्यात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. भय्युजी महाराज हे मला मोठे भाऊ म्हणून बाबासाहेब या नावाने बोलत असत असे स्पष्ट करून इंदूर ते इंदापूर नाते विशद करत भय्युजी महाराज यांचे इंदापूर येथील सर्व संकल्पित प्रकल्प राबविण्याचे सूतोवाच त्यांनी केले. यावेळी भय्यूजी महाराज यांच्या आठवणीमुळे सर्वजण भावनाप्रधान झाले होते. यावेळी डॉ. उस्मानी यांचा दिलीप वाघमारे तर इंदापूर आश्रमासाठी जागा दिलेले गोरख शिंदे यांचा डॉ. उस्मानी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
डॉ. पीर सय्यद इरफान मोईन उस्मानी पुढे म्हणाले, भय्यूजी महाराज हे अखिल प्राणी मात्र यांच्यासाठी केलेल्या कार्यामुळे अमर आहेत. त्यांनी पर्यावरण संतुलन, दुष्काळ निवारण करण्यासाठी गाव तिथे तळे, गरीब मुलींना शैक्षणिक शिष्यवृत्ती, शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी विशेष उपक्रम, एचआयव्ही बाधित युवापिढी साठी आश्रम, मेळघाटातील कुपोषित बालकांसाठी प्रकल्प, गरीब मुलींची लग्ने यासाठी भरीव योगदान दिले आहे. त्यांच्या सर्व कार्याचा आदर्श आपण पुढे नेणे ही काळाची गरज आहे. भय्यूजी महाराज यांनी स्थापन केलेल्या इंदापूर आश्रमाचे व्यवस्थापन चांगले असून गुरु गादीची निरंतर सेवा करत रहा असा संदेश त्यांनी दिला. इंदापूर भक्तांच्या आग्रहास्तव आपण इंदापूर गुरुपौर्णिमा उत्सवासाठी निश्चित येणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
यावेळी पुणे येथील डॉ. प्रशांत देशमुख म्हणाले, सद्गुरु भय्यूजी महाराज आणि अजमेर शरीफ चे संत डाॅ. श्री. पीर सईद इरफान मोईन उस्मानी बाबा या दोघांमध्ये जिवश्चकंठश्च स्नेह होता. भारतातील विविध शहरात त्यांनी विविध धर्म, पंथांच्या धार्मिक, सार्वजनिक, सामाजिक कार्यक्रमातून समाज प्रबोधन करून भारतीय संस्कृती संवर्धित केली. त्यांनी जगाला प्रेम, सद्भावना, शांती व मानवतेचा संदेश दिला. त्यामुळे गुरुसेवा व गुरुतत्व केंद्रबिंदू मानून सर्वांनी त्यांचे कार्य जोमाने पुढे चालवावे असे आवाहन केले. यावेळी हरीश पाटील, हिंजवडीचे उद्योजक सूर्यकांत साखरे पाटील, राजेंद्र पवार, प्रदीप पवार, सुनील बनसुडे, तैय्यब शेख, सलीम बागवान, अंगद तावरे, डॉ. संतोष नगरे, सतीश कस्तुरे, दीपक चौधरी, सुभाष पानसरे तसेच शिष्य परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता. स्वागत बसवेश्वर लंगोटे, अनिल परदेशी यांनी तर प्रास्ताविक व सूत्रसंचालन अरूण चव्हाण यांनी केले. आभार दिलीप वाघमारे यांनी मानले.