क्राईम रिपोर्ट

‘लाईक्स-व्ह्यूज’च्या नादात कायदा मोडला; इन्स्टाग्राम रीलवरून सुपा पोलिसांची कारवाई

इन्स्टाग्रामवरील ‘आभासी भाईगिरी’ पडली महागात

‘लाईक्स-व्ह्यूज’च्या नादात कायदा मोडला; इन्स्टाग्राम रीलवरून सुपा पोलिसांची कारवाई

इन्स्टाग्रामवरील ‘आभासी भाईगिरी’ पडली महागात

सुपा : प्रतिनिधि

सोशल मीडियावर लाईक्स, व्ह्यूज आणि फॉलोअर्स मिळवण्यासाठी शस्त्र हातात घेऊन रील बनवणे एका तरुणाला चांगलेच महागात पडले आहे. इन्स्टाग्रामवर पिस्तूलसदृश्य वस्तू हातात घेत प्रक्षोभक आणि धमकीवजा मजकूर असलेला व्हिडिओ प्रसारित केल्याप्रकरणी सुपा पोलिसांनी प्रेम प्रताप जगताप (रा. बाबुर्डी, ता. बारामती) याच्याविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे.

सुपा पोलीस ठाण्याच्या सायबर मॉनिटरिंग पथकाच्या निदर्शनास २४ ऑगस्ट २०२६ रोजी ‘prem_jagtap_0295’ या इन्स्टाग्राम अकाउंटवरील व्हिडिओ आला. या व्हिडिओमध्ये संबंधित तरुण पिस्तूलसदृश्य वस्तू हातात घेऊन दिसत असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.

व्हिडिओवर ‘आलीशान युवा प्रतिष्ठान’ असा मजकूर तसेच समाजात दहशत निर्माण करणारा प्रक्षोभक मजकूर वापरण्यात आला होता. ऑडिओमध्येही हल्ल्याचा संदर्भ असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न झाल्याचे पोलिसांच्या कारवाईत नमूद करण्यात आले आहे.

पुणे ग्रामीण जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदीचे आदेश लागू असताना त्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी सुपा पोलिसांनी स्वतःहून फिर्याद दाखल केली. आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३५१(२)(३), २२३, भारतीय शस्त्र कायदा कलम ३(२५) तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७(१)(३) व १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार रुपेश साळुंके करीत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सुपा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक मनोजकुमार नवसरे यांच्या पथकाने केली.

पोलिसांचा तरुणांना इशारा

सोशल मीडियावर ‘आभासी भाईगिरी’ दाखवण्यासाठी शस्त्रांचे प्रदर्शन करणाऱ्या व्यक्तींवर पोलिसांची सायबर यंत्रणा लक्ष ठेवून आहे. रील किंवा व्हिडिओच्या माध्यमातून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा सुपा पोलिसांनी दिला आहे. तरुणांनी सोशल मीडियाचा वापर करताना कायद्याचे भान ठेवावे, असे आवाहनही पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Back to top button