लॉकडाउन होणार नाही मात्र शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करणे आवश्यक – राज्यमंत्री दत्तात्रय भरणे
वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यमंत्र्यांनी घेतली आढावा बैठक

लॉकडाउन होणार नाही मात्र शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करणे आवश्यक – राज्यमंत्री दत्तात्रय भरणे
वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यमंत्र्यांनी घेतली आढावा बैठक
इंदापूर : प्रतिनिधी
इंदापूर तालुक्यात वाढत असलेली कोरोना रुग्णांची संख्या पहाता राज्यमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे व पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य अधिकारी आयुष प्रसाद यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये आज (दि.२७) रोजी इंदापूर शासकीय विश्रामगृह या ठिकाणी आढावा बैठक संपन्न झाली.यावेळी वरील मत राज्यमंत्र्यांनी व्यक्त केले.
सध्या इंदापूर तालुक्यात एकूण १०८ कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या असून यामध्ये इंदापूर तालुक्यातील ग्रामीण भागात ७६ तर शहरात ३२ कोरोनाग्रस्त रुग्ण आहेत.यामध्ये इंदापूर तालुक्यातील भिगवण,पळसदेव या ठिकाणी रुग्ण संख्या अधिकची असून इंदापूर शहरातील आंबेडकर नगर मध्ये रुग्ण संख्या जास्त आहे.त्यामुळे कोरोनाचा अधिक फैलाव होऊ नये म्हणून घरोघरी जाऊन सर्व्हे करण्याच्या सूचना यावेळी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
इंदापूर शहरात, गल्लोगल्ली,बाजारपेठेत तसेच आठवडे बाजार,मंडई येथे गर्दी न करता सॅनिटायझर,व मास्कचा वापर याबाबत अंमलबजावणी करून मास्कचा वापर न करणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे यावेळी राज्यमंत्र्यांनी सांगितले.
लॉकडाउन बाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना भरणे म्हणाले की,लॉकडाउन होणार नाही परंतु नागरिकांनी शासनाने घालून दिलेल्या नियम व अटींचे पालन करणे आवश्यक आहे. लॉकडाउन च्या नावाखाली काही लोक साठेबाजार करतात. शेतकऱ्यांकडून माल कवडीमोल दराने घेऊन चढ्या भावाने विकतात त्यामुळे शेतकऱ्याची पिळवणूक होते.
यावेळी राज्यमंत्री दत्तात्रय भरणेंनी नगपरिषदेच्या अधिकाऱ्यांना रुग्णवाहिकेसाठी प्रस्ताव लवकरात लवकर सादर करण्याच्या सूचना केल्या असून आमदार फंडातून त्वरित रुग्णवाहिका मंजूर करणार असल्याचे सांगितले.
यावेळी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य अधिकारी आयुष प्रसाद,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.भगवान पवार,तहसीलदार अनिल ठोंबरे,पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे,गट विकास अधिकारी विजयकुमार परीट,इंदापूर नगरपरिषदेच्या प्रशासकीय अधिकारी वर्षा क्षीरसागर, वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रशांत महाजन, भिगवण पो.स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने,वालचंदनगर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार तसेच विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.