लॉकडाऊन काळात हृदयविकाराच्या रुग्णांत ५० टक्के घट
आजारांच्या उपचारासाठी रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांच्या प्रकृतीत २३ टक्क्यांनी गुंतागुंत निर्माण झाली आहे.
लॉकडाऊन काळात हृदयविकाराच्या रुग्णांत ५० टक्के घट
आजारांच्या उपचारासाठी रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांच्या प्रकृतीत २३ टक्क्यांनी गुंतागुंत निर्माण झाली आहे.
बारामती वार्तापत्र
लॉकडाऊनच्या काळात हृदयविकाराच्या रुग्णांत ५० टक्क्यांनी घट झाली. मागील वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत हे प्रमाण कमी झाले आहे. मात्र, कोरोनाच्या भीतीने या रुग्णांनी उपचारांत विलंब केल्याने हृदयविकार असलेल्या रुग्णांच्या मृत्युदरात वाढ झाल्याचे निरीक्षण देशभरातील हृदयविकार तज्ज्ञांनी नोंदवले.
२९ सप्टेंबर, जागतिक हृदय दिनाच्या पार्श्वभूमीवर, हृदयविकार तज्ज्ञांनी हृदयाची काळजी घेणे ही सुदृढ आरोग्याची पहिली पायरी असल्याचा सल्ला दिला.हृदयविकार तज्ज्ञ डाॅ.शशांक जळक,यांनी सांगितले, कोरोना, लॉकडाऊनच्या काळात हृदय व रक्तवाहिन्यांशी संबंधित आजाराच्या रुग्णांमध्ये मृत्युदर वाढला आहे, तर या आजारांच्या उपचारासाठी रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांच्या प्रकृतीत २३ टक्क्यांनी गुंतागुंत निर्माण झाली आहे.
याखेरीज, ८ ते १२ टक्के हृदयविकारांच्या रुग्णांमध्ये उपचारांना विलंब झाल्याने धोका निर्माण झाला आहे. यंदाच्या जागतिक हृदय दिनाच्या संकल्पनेत हृदय व रक्तवाहिन्यांशी संबंधित आजारांना आळा घाला, असा संदेश देण्यात आला आहे. जागतिक स्तरावर ३१ टक्के मृत्यू या आजारांमुळे होत असल्याचे दिसून आले आहे. तंबाखूचे सेवन, धोकादायक जीवनशैली, स्थूलता, शारीरिक व्यायामाचा अभाव यामुळे या आजारांचा धोका वाढत असल्याचेही त्यांनी नमूद केले. वायुप्रदूषणातील घट, घरी राहणे, पोषक आहार घेणे आणि झोपेच्या बदललेल्या सवयींमुळे हृदयविकारांच्या रुग्णांचे प्रमाण कमी झाले आहे, परंतु कोरोनाचा संसर्ग होईल, या भीतीने उपचार घेण्यास टाळाटाळ करणे, औषधे वेळेवर उपलब्ध न होणे, खाटांची उपलब्धता नसणे, यामुळे मृत्युदर वाढल्याचे सांगितले.
हृदयशल्यचिकित्सा विभाग २४ तास सुरू ठेवावा
लॉकडाऊनच्या काळात हृदयविकार रुग्णांची परवड होऊ नये, यासाठी रुग्णालयांमध्ये विशेष पथक स्थापन केले. यात तज्ज्ञ डॉक्टर, परिचारिका व पॅरा मेडिकल स्टाफ हे खास विभागांसाठी नेमले होते. हृदयविकार तज्ज्ञ डाॅ.शशांक जळक यांनी सांगितले की, हृदयविकारावर तत्काळ उपचार मिळाले नाहीत, तर अनेकांना जीव गमवावा लागतो. म्हणूनच अन्य रुग्णालयांनीही हृदयशल्यचिकित्सा विभाग २४ तास सुरू ठेवावेत.